पुणे/धाराशिव: “एकही गाव सुटता कामा नये, सरसकट पंचनामे करा,” असे ‘कडक’ आदेश पुण्यातून परंड्याच्या तहसीलदारांना फोनवरून देतानाचा माजी मंत्री तानाजी सावंत यांचा व्हिडिओ त्यांचे समर्थक सोशल मीडियावर अभिमानाने फिरवत आहेत. मात्र, नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिने मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारे आमदार आता ऐन पावसाळ्यात पुण्यात बसून दाखवत असलेली ही उसनी सहानुभूती म्हणजे ‘पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर आलेले शहाणपण’ असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
‘डच्चू’ मिळाल्यापासून मतदारसंघाकडे पाठ
उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत तानाजी सावंत यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना अडीच वर्षे मंत्रिपद आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही मिळाले. मात्र, नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून त्यांचा विजय अवघ्या १५०९ मतांच्या निसटत्या फरकाने झाला. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले आणि सावंत यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळाला. तेव्हापासून आजतागायत, म्हणजे जवळपास नऊ महिने, आमदार सावंत मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत, असा थेट आरोप स्थानिक नागरिक आणि विरोधक करत आहेत.
विरोधक आता महायुतीत, तरीही विस्तव कायम
राजकीय समीकरणेही आता बदलली आहेत. एकेकाळचे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि निवडणुकीत कडवी झुंज देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील झाले आहेत. याचाच अर्थ, तांत्रिकदृष्ट्या सावंत आणि मोटे दोघेही आता महायुतीमध्ये आहेत. मात्र, त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असून ‘आडवा विस्तव’ जात नाही, हेही तितकेच खरे आहे. मोटे यांच्या पक्षबदलामुळे मतदारसंघातील राजकीय पकड ढिली होण्याची भीती सावंत यांना वाटत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रत्यक्ष पाहणीऐवजी ‘फोनवरून’ तंबी
काही दिवसांपूर्वीच भूम, वाशी, परंडा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः थैमान घातले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशा गंभीर परिस्थितीत मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष बांधावर जाऊन धीर देण्याऐवजी, सावंत यांनी पुण्यातूनच फोनवरून पंचनाम्याचे आदेश देण्याचा ‘सोयीस्कर’ मार्ग निवडला. त्यांच्या या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीवर शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “साहेब, फोनवरून नुकसानीचा अंदाज येत नसतो, त्यासाठी चिखल तुडवावा लागतो,” अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
आमदारांच्या या ‘व्हर्च्युअल’ पाहणी दौऱ्यामुळे, अडचणीत सापडलेल्या बळीराजाला खरा दिलासा मिळणार की हा केवळ राजकीय स्टंटबाजीचा एक भाग ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.