पुणे: माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाला थांबवण्यासाठी संपूर्ण पोलिस आणि विमानतळ यंत्रणा वेठीस धरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पुणे पोलिसांवर दबाव आणून तत्काळ गुन्हा दाखल केला आणि विमान कंपनीला विमान चेन्नईत उतरवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच थांबले नाहीत, तर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून विमान थेट माघारी फिरवले!
68 लाख खर्चून बँकॉकला निघालेला मुलगा माघारी
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत (वय ३०) हा बजाब एव्हिएशनच्या ‘फाल्कन 2000 एलएक्स’ या चार्टर फ्लाईटने थेट बँकॉकला जाणार होता. यासाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च झाले होते. मात्र, वडिलांनी वेळेत सूत्र हलवली आणि विमानाला चेन्नईत उतरवण्याचा आदेश मिळाला.
काय घडलं?
ऋषीराज दुपारी अचानक घर सोडून बाहेर पडला. सावंत अस्वस्थ झाले. चौकशीत समजले की, तो बँकॉकला जात असल्याने सावंतांनी थेट पोलिसांकडे तक्रार दिली. त्यामुळे पुणे पोलिस आणि विमानतळ प्रशासनावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशाने विमान परत!
तानाजी सावंत हे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली नेते असल्याने केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यानंतर विमान कंपनीवर दबाव टाकण्यात आला आणि विमान माघारी फिरवण्याचे आदेश देण्यात आले.
तानाजी सावंत यांनी काय सांगितले?
सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, “मुलगा बेपत्ता नव्हता, पण तो अचानक घराबाहेर पडला आणि आमचा संपर्क झाला नाही. त्यामुळे काळजी वाटली. म्हणूनच पोलिसांकडे तक्रार दिली. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता.”
पोलिसांची भूमिका
पोलिसांनी अधिकृतरित्या सांगितले की, “माजी मंत्र्यांची तक्रार आली आणि आम्ही यंत्रणा सक्रिय केली. ऋषीराज चार्टर फ्लाईटने जात असल्याची माहिती मिळताच विमान कंपनीशी संपर्क साधला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून विमान थांबवण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभाग पुढील तपास करत आहे.”
कौटुंबिक वादाचा एवढा गहजब?
तानाजी सावंत यांनी संपूर्ण सरकारी आणि खासगी यंत्रणा हलवून टाकल्यामुळे यावर आता राजकीय चर्चाही सुरू झाली आहे. सामान्य माणसाने तक्रार केली असती, तर अशी जलद कारवाई झाली असती का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.