वाशी : वर्गात शिकवत असताना शाळेत घुसून शिक्षकाला शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील यशवंडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाणीचा गुन्हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दादासाहेब अभिमान साळुंके (वय ५०, रा. वाशी) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते यशवंडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक साळुंके हे दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावर मुलांना शिकवत होते.
यावेळी आरोपी देवानंद सुर्यभान गिरी (रा. यशवंडी) हा वर्गात आला आणि त्याने कोणत्याही कारणाशिवाय शिक्षक साळुंके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने साळुंके यांना लाथाबुक्यांनी आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यामुळे वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर शिक्षक दादासाहेब साळुंके यांनी ७ ऑक्टोबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी देवानंद गिरी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१(१), १३२, ११८(१), ११५, १५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शाळेत घुसून शिक्षकाला झालेल्या या मारहाणीमुळे शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.