उमरगा: शिर्डीहून दर्शन घेऊन हैद्राबादकडे परतणाऱ्या बलेनो कारला उमरगा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत गाडीतील एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला असून, अन्य दोघे जण सुखरूप बचावले आहेत. सुकुमार पेंटलवल्ली (वय ५७), असे मृत व्यक्तीचे नाव असून ते हैदराबाद येथील सरकारी शाळेत शिक्षक होते. ही घटना संशयास्पद असून पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे कार्यरत असलेले आणि हैद्राबाद येथील व्यंकटेश्वरा कॉलनीत वास्तव्यास असणारे शिक्षक सुकुमार पेंटलवल्ली हे विजयकुमार भास्कर शर्मा नारायणम आणि कार्तिक नागय्या कोंडा यांच्यासोबत शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन हैद्राबादला परत जात असताना दाबका गावाजवळ त्यांच्या बलेनो कारने अचानक पेट घेतला.
आग लागल्याचे लक्षात येताच विजयकुमार आणि कार्तिक हे दोघे तात्काळ गाडीबाहेर पडले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, सुकुमार पेंटलवल्ली यांना गाडीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांचा गाडीतच जळून दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रवाशांच्या विसंगत उत्तरांमुळे घातपाताचा संशय
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत दोघे जण सुखरूप बचावले असून एकाचा मृत्यू झाल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला आहे. पोलिसांनी वाचलेल्या दोघांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची आणि विसंगत उत्तरे मिळत असल्याने हा संशय अधिकच बळावला आहे. “आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. बचावलेल्या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस आणि न्यायवैद्यक पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.