तुळजापूर – तेलंगणातील एका वरिष्ठ महिला न्यायाधीशांच्या गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना तुळजापुरात घडली आहे. न्यायाधीश हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच चोरट्यांनी डाव साधला. एका उच्चपदस्थ व्यक्तीसोबत झालेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी कविता देवी पर्णचंद्राराव गंटा (वय ४८, रा. जहीराबाद, तेलंगाना) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कविता गंटा या तेलंगाना राज्यातील संघारेड्डी जिल्ह्यात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (Senior Civil Judge) म्हणून कार्यरत आहेत. त्या रविवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी आपल्या महिंद्रा एक्सयुव्ही ७०० (क्र. टीएस २८ एल ६६६६) या गाडीने तुळजापुरात आल्या होत्या.
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्या शहरातील अशोक हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. त्यांनी आपली गाडी हॉटेलबाहेर उभी केली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या खिडकीची काच फोडून आतील एक ईटकरी बॅग आणि एक काळ्या रंगाची हॅंड बॅग लंपास केली.
या बॅगांमध्ये १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३५ हजार रुपये रोख, एक मोबाईल फोन आणि काही नवीन कपडे होते. चोरट्यांनी एकूण ५ लाख २४ हजार रुपयांच्या मालावर डल्ला मारला. जेवण करून बाहेर आल्यानंतर गाडीची काच फुटलेली आणि आतील सामान चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत.