धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
प्रतिनियुक्त्या रद्द झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ पदस्थापनेवर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नागरी दवाखाने यासारख्या विविध आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारींचा समावेश आहे.
या निर्णयामुळे आरोग्य विभागातील काही पदांवर तात्पुरती पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेवर परतल्याने त्या ठिकाणच्या आरोग्य सेवांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या मूळ पदस्थापना
- डॉ. चंद्रकांत किसन ऐवळे: तालुका आरोग्य अधिकारी, धाराशिव
- डॉ. विवेक होळे: जिल्हा क्षयरोग कार्यालय, धाराशिव
- डॉ. विनायक हंगे: युनानी दवाखाना, मस्सा खां, ता. कळंब
- डॉ. अश्विनी चौधरी: प्राथमिक आरोग्य केंद्र, पोहनेर
- डॉ. शकील खान: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव
- डॉ. मंगेश क्षिरसागर: प्रा. आ. के., येडशी
- डॉ. प्रणिता कोंडेरी: प्रा. आ. के., ढोकी
- डॉ. स्वप्नाली इंगळे: प्रा. आ. के., ढोकी
- डॉ. झेड वाय पटेल: प्रा. आ. के., अणदूर, ता. तुळजापूर
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.