तेरखेडा : तेरखेडा ते कडकनाथवाडी रोडवर सोमवारी (दि. २९) रात्री घडलेल्या भीषण अपघातानंतर परिस्थिती स्फोटक बनली आहे. पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या एका महाकाय कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने कडकनाथवाडी येथील चांदपाशा लोहार ( शेख) आणि वसंत जगताप या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांचा संयम सुटला असून, त्यांनी प्रशासनाला घेराव घातला आहे. “जोपर्यंत तहसीलदार घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत पंचनामा होऊ देणार नाही आणि मृतदेहही हलवू देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे.
रात्रीपासून मृतदेह रस्त्यावरच; तणाव वाढला
सोमवारी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. चांदपाशा लोहार ( शेख ) आणि वसंत जगताप हे दोघे दुचाकीवरून गावी परतत असताना पवनचक्कीच्या कंटेनरने त्यांना चिरडले. अपघाताची माहिती मिळताच कडकनाथवाडीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्र उलटून गेली तरी अद्याप मृतदेह आणि अपघातग्रस्त वाहने जागेवरच आहेत. संतप्त जमावाने घटनास्थळी ठिय्या मांडला असून, जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि तहसीलदार जागेवर येत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पोलीस आणि ग्रामस्थांत बाचाबाची झाली.
“शेतकऱ्यांवर गुंडांची दहशत”
या अपघातामुळे ग्रामस्थांमधील साचलेला संताप बाहेर आला आहे. गावकऱ्यांनी पवनचक्की कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “पवनचक्कीचे कंत्राटदार गावगुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर दहशत माजवत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही बळजबरीने शेतातून रस्ते तयार केले जात आहेत आणि कोठूनही ही अवजड वाहने नेली जात आहेत,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मुजोरीमुळेच आणि अवैध वाहतुकीमुळेच निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
महिन्याभरात एकाच गावातील तीन बळी
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कडकनाथवाडीने महिन्याभरात तीन पुत्र गमावले आहेत. अवघ्या एक महिन्यापूर्वी याच रस्त्यावर पवनचक्कीच्या वाहनाखाली एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा नसून मृत्यूचा सापळा बनला आहे.
अपघाताची सद्यस्थिती (Highlights):
-
🔴 मृत: चांदपाशा लोहार ( शेख ) व वसंत जगताप (रा. कडकनाथवाडी).
-
🔴 घटना: सोमवारी रात्री ७:३० वा. मोटारसायकलला कंटेनरची धडक.
-
🔴 तणाव: मृतदेह अजूनही घटनास्थळीच; ग्रामस्थांचा पंचनाम्यास नकार.
-
🔴 मागणी: तहसीलदार घटनास्थळी आल्याशिवाय पुढील कार्यवाही नाही.
-
🔴 आरोप: गावगुंडांची दहशत वापरून पवनचक्कीची अवैध वाहतूक सुरू.






