वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सिट्ट्या व मोटरसायकलच्या हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हे प्रकरण उफाळून आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिला गट: छायाबाई उकरंडे यांची फिर्याद
प्राप्त माहितीनुसार, छायाबाई शिवाजी उकरंडे (वय 58 वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता त्यांच्या मुलगा सचिन उकरंडे व पुतण्या धनंजय उकरंडे यांना ऋषीकेश घुले, ऋषीकेश जाधव, अक्षय चव्हाण, स्वप्निल पौळ, कृषा कचरे, समाधान घोलप, अनिकेत उकरंडे, यश माने, निखील काळे, किशोर कचरे व इतर पाच जणांनी शारीरिक व शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.
यावेळी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या राहुल उकरंडे व अमित उकरंडे यांनाही आरोपींनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेच्या आधारावर छायाबाई उकरंडे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीसांनी भा.न्या.सं.कलम 109, 189(2), 191(1), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) (3), 324(4)(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरा गट: ऋषीकेश घुले यांची फिर्याद
दुसऱ्या घटनेत, ऋषीकेश बळीराम घुले (वय 21 वर्षे, रा. तेरखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना सचिन उकरंडे, राहुल उकरंडे, अमित उकरंडे, विराज उकरंडे, आदित्य उकरंडे, धनंजय उकरंडे, अमोल उकरंडे, छायाबाई उकरंडे, नितीन उकरंडे या व्यक्तींनी लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या किशोर धावारे यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 109, 189(2), 191(1), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे तेरखेडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येरमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दोन्ही गटांमध्ये वादाचे खरे कारण काय, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.