तेरखेडा – पाण्याच्या बादलीला हात लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथे घडली. ही घटना रविवारी (दि. १८ मे २०२५) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानीबाई उर्फ गणेश बप्पा काळे (वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानीबाई यांनी आरोपींच्या घरातील पाण्याची बादली न विचारता घेतल्याचा राग मनात धरून आरोपी सुरेखा पोपट पवार, रावसाहेब गोविंद पवार आणि हिराबाई बप्पा काळे (सर्व रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी जानीबाई काळे यांनी रविवारीच येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून सुरेखा पवार, रावसाहेब पवार आणि हिराबाई काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११७(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.