वाशी/नळदुर्ग/कळंब/ढोकी: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये घरफोडी करून धान्य व दागिने, शेतकऱ्यांची जनावरे, दुचाकी आणि शेतातील सोलर मोटार चोरल्याच्या घटनांचा समावेश आहे.
१. वाशी: बंद घर फोडून धान्य व चांदीचे पैंजण लंपास
वाशी तालुक्यातील पारगाव येथे बंद घराच्या खिडकीचा दरवाजा उघडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी वच्छला लक्ष्मण वंजारे (वय ६५, सध्या रा. हातोला, ता. वाशी) यांचे पारगाव येथे घर आहे. दिनांक २१ ते २७ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरांनी खिडकीवाटे प्रवेश करून घरातील गव्हाचे कट्टे, सोयाबीनचा एक कट्टा, रेशनचा तांदूळ आणि एक चांदीचे पैंजण असा एकूण १४,६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. नळदुर्ग: हिप्परगा तांडा येथून जनावरे चोरीला
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिप्परगा तांडा शिवारामध्ये शेतकऱ्याच्या गोठ्यातून जनावरे चोरीला गेली आहेत. किशोर बलभीम ढाले (वय ३०) यांच्या शेतातून २५ डिसेंबरच्या रात्री ते २६ डिसेंबरच्या सकाळदरम्यान अज्ञात चोरांनी दोन म्हैस, एक रेडकू आणि एक बोकड असा एकूण ६३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. कळंब: घरासमोरून दुचाकी गायब
कळंब शहरातील परळी बायपास रोडवर राहणारे बळीराम लिंबाजी चव्हाण (वय ३९) यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५, एएक्स ४९८९) त्यांच्या घरासमोर उभी होती. २३ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने ही ३०,००० रुपये किमतीची गाडी चोरून नेली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
४. ढोकी: शेतातील सोलर मोटार चोरली
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवारात शेती साहित्य चोरीला गेले आहे. प्रभाकर दत्तात्रय घोगरे (वय ८१, रा. उपळा) यांच्या गट नं. ४०८ मधील विहिरीवरील १८,००० रुपये किमतीची सोलर ऊर्जेची मोटार आणि २०० फूट केबल अज्ञात चोरांनी लंपास केली. ही घटना ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान घडली असून, आता २८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






