धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. गुंजोटी येथे गोदामातून धान्य, तुळजापुरात गर्दीचा फायदा घेत दागिने, वाशीत शेतकऱ्याचा सोलर पंप आणि येरमाळयात शोरूम फोडून ऑईलची चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
१. गुंजोटीत गोदामातून सोयाबीन व तुरीची चोरी (उमरगा पोलीस ठाणे)
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील ‘पदमा इंडस्ट्रीज’च्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धान्य लांबवले आहे. ही घटना २१ ते २२ डिसेंबरच्या दरम्यान घडली. फिर्यादी विनोद भालचंद्र पतंगे, सुभाष जगन्नाथ पतंगे आणि चंद्रकांत जगन्नाथ पतंगे यांचे मिळून एकूण ११ कट्टे सोयाबीन, ५ कट्टे तूर आणि इतरांचे सोयाबीन असा एकूण ९१,५०० रुपयांचा माल चोरट्यांनी पळवला. याप्रकरणी विनोद पतंगे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. तुळजापुरात बसमधील गर्दीत दागिने चोरीला (तुळजापूर पोलीस ठाणे)
तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकावर बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचे दागिने चोरण्यात आले. सुकुमार अंतलेश्वर सुरवसे (रा. धाराशिव) हे १८ डिसेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता बसमधून उतरत होते. त्यावेळी त्यांच्या पर्समधील ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत १,५६,००० रुपये) अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
३. वाशीत विहिरीवरील सोलर पंप लंपास (वाशी पोलीस ठाणे)
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) शिवारात शेतकऱ्याच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरून नेल्याची घटना घडली आहे. शेतकरी औदुंबर गोवर्धन तावरे यांच्या गट नं. ४३५ मधील विहिरीवरून अल्टेक सोलार कंपनीचा ३ एच.पी. क्षमतेचा सोलर पंप आणि केबल असा एकूण २३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
४. शोरूमची काच फोडून ऑईलची चोरी; आरोपीवर गुन्हा (येरमाळा पोलीस ठाणे)
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नापूर शिवारात असलेल्या ‘सोनालिका ट्रॅक्टर्स श्रीराम मोटर्स’ शोरूममध्ये चोरी झाली. आरोपी अनिकेत संजय अडसूळ (वय २२, रा. ईटकुर, ह.मु. बाबानगर, कळंब) याने १३ डिसेंबरच्या रात्री शोरूमच्या काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. त्याने शोरूममधून २० लिटरचे हायड्रोलिक ऑईलचे बॉक्स असा १४,००० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी गोविंद उद्धवराव घुले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत अडसूळ विरोधात येरमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






