लोहारा : तालुक्यातील सलगरा-उंदरगाव रोडवरील पवनचक्की सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र सिंदफळे यांच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
३१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १.२० वाजण्याच्या सुमारास सिंदफळे हे सबस्टेशनवर ड्युटीला होते. त्यावेळी अचानक एक ट्रक, एक क्रेन आणि एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी सबस्टेशनजवळ आली. गाडीतून आलेल्या दोन इसमांनी सिंदफळे आणि त्यांचे सहकारी अक्षय निर्मळे यांना कत्तीचा धाक दाखवून पकडले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी सबस्टेशनमधील ८.५ लाख रुपये किमतीचे १० ड्रम जुने पँथर कंडक्टर अॅल्युमिनियम चोरून नेले.
चोरी करून झाल्यानंतर, सिंदफळे आणि निर्मळे यांना चारचाकी गाडीत बसवून तोंरंबा गावाकडे नेण्यात आले. सोलापूर-लातूर महामार्गावर काही वेळ फिरवल्यानंतर पुन्हा तोंरंबा पाटी येथे आणले. तेथे त्यांना सोडून चोरटे पळून गेले.या घटनेची माहिती सिंदफळे यांनी सबस्टेशनच्या सिक्युरिटी पेट्रोलिंग गाडीतील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी दोन आरोपीना अटक कऱण्यात आली आहे. त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली . परंतु उर्वरित आरोपीची नावे कळूनही पोलिसांनी अदयाप त्यांना अटक केलेली नाही. चिरीमिरी घेऊन पोलीस मूग गिळून गप्प आहेत.
गुटखा गाडी लुटणारी तुळजापूरची गॅंग आता ऐल्युमिनियम तार चोरीकडे वळली आहे. पोलिसाना नावे , पत्ता माहित असतानाही पोलीस गप्प असल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.