धाराशिव – जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, तुळजापूर आणि बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी मोटारसायकलसह मोबाईल टॉवरमधील महागडे उपकरण लंपास केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे ५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, तुळजापूर शहरातील पापनास परिसरातून एका ३०,००० रुपये किमतीच्या मोटारसायकलची दिवसाढवळ्या चोरी झाली. धारूर येथील रहिवासी रमजान मकबुल सय्यद (वय ३१) यांनी ३० ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एक ते दीडच्या सुमारास आपली होंडा शाईन (क्र. एमएच २५ बी.ई. ०६७१) शिंदे प्रशालेसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी रमजान सय्यद यांनी ४ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडोळी येथे घडली. खंडाळा (ता. तुळजापूर) येथील महादेव पंडीत ढवन (वय ४२) हे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाडोळी येथील इंडस टॉवरची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने टॉवरमधील सुमारे २०,००० रुपये किमतीचे ‘व्हीलचे बेस बॅन्ड ६६३१ कार्ड’ चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी महादेव ढवन यांनी ४ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटनांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.