भूम – मागील भांडणाच्या कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून ५६ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे. ‘तुझा हातच बाजूला काढतो’ अशी धमकी देऊन आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांविरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मोहन बाबुराव अस्वले (वय ५६, रा. चिंचोली, ता. भूम) हे मंगळवारी, दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिंचोली ते पाथ्रुड जाणाऱ्या रस्त्यावरील दत्ता वारे यांच्या गॅरेजसमोर होते. यावेळी तिथे आलेल्या आरोपी रेवण महादेव वारे, अभिमन्यु महादेव वारे आणि पार्वती महादेव वारे (सर्व रा. चिंचोली) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोहन अस्वले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुझा हातच बाजूला काढतो’ अशी धमकी देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेनंतर मोहन अस्वले यांनी गुरुवारी, दि. ०९ ऑक्टोबर रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.