धाराशिवात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळीच रंगतदार तयारी सुरू झाली आहे. असं वाटतंय की, निवडणुकीपेक्षा मोठा मुकाबला महायुतीत होणाऱ्या “तिकीट घे-दे” सामना स्पर्धेत दिसणार आहे. महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार कैलास पाटील हे जरी सध्या थंड डोक्याने बघत बसले असले तरी महायुतीचे संभाव्य उमेदवार मात्र “जाणं हवंय, तिकीट नक्की!” या घोषवाक्याखाली एकमेकांची तंगडं खेचायला सुरुवात केली आहे.
महायुतीच्या मैदानात सध्या भाजपचे राणा जगजितिसंह पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. “तिकीट मिळावं, नाहीतर असं काही करू की घरातलं दार बंद होईल,” या थाटात ते दोघेही एकमेकांसमोर उभे आहेत. राणा पाटील यांची बायसेप्स फुलवण्याची तयारी तर तानाजी सावंत यांची स्टॅमिना टिकवण्याची योजना, दोघेही एकमेकांना टाळता येत नाहीत.
त्यात भाजपमधल्या नितिन काळे आणि दत्ता कुलकर्णी या दोघांनी “भाऊ” नावाला न्याय देत मतदारसंघ पिंजून काढला आहे. “नितिन भाऊंचं घर म्हणजे मतदारसंघाचं ऑफिसच आहे,” अशी चर्चा गावभर सुरू आहे. त्यांच्याशिवाय अजित पिंगळे सुद्धा तयारच आहेत, “मी तिकडे हसलोय, पण इथे गंभीर आहे,” असं ते सांगतात.
शिवसेना शिंदे गटात मात्र सहा उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरायची तयारी केली आहे. अनिल खोचरे, सूरज साळुंके, नितीन लांडगे या मंडळींनी आधीच अर्ज टाकून ठेवले आहेत, पण आता शिक्षण सम्राट सुधीर पाटील आणि कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे या दोन नावांनी सगळी गणितं बिघडवलीत. सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना धाराशिवात बोलावून मेळावा घेतला आणि सगळ्यांना स्पष्ट इशारा दिला, “मीच इथला हेड, बाकी बसा शांत!” पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या डोळ्यांच्या पापण्या लवू न देता त्यांनी हा स्टंट केला आहे.
शिवाजी कापसे यांनीही तर थेट परंड्यात जाऊन शिंदे साहेबांच्या उपस्थितीत ठाकरे गटातून शिंदे गटात उडी मारली आणि मलाच उमेदवारी हवी असा हट्ट धरून बसलेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आता भावी खासदार होर्डिंग्ज उतरावरून आता भावी आमदार हे नवे होर्डिंग्ज लावण्यास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीचे कैलास पाटील मात्र आपल्या सोफ्यावर शांत बसले आहेत, कारण त्यांचे तिकीट कन्फर्म आहे. आता महायुतीच्या डब्यात कोणाला जागा मिळणार, हे पाहणे तितकंच मनोरंजक ठरणार आहे. या रस्सीखेचीत तिकीट कोणाचं तुटणार, कोणाचं मिळणार, आणि कोण शह-काटशह देणार, याचं उत्तर वेळच देईल!
– बोरूबहाद्दर