धाराशिव: विदर्भातून तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवमध्ये आलेला T22 वाघ सध्या वनविभागाला चांगलाच चकवा देत आहे. हा ‘रॉकी’ वाघ आता भूम तालुक्यात पोहोचला असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
ताडोबाची टीमही हतबल!
T22 वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या जंगलातून पन्नास जणांची विशेष टीम धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली होती. पण हा वाघ एवढा हुशार निघाला की, त्याने या टीमला चांगलंच चकवले. वाघाचे ठसेही या टीमला सापडले नाहीत. वाघ पुढे आणि टीम मागे अशी अवस्था झाल्यावर निराश होऊन ही टीम परत गेली.
पुण्याची टीमही अपयशी!
ताडोबाच्या टीमला अपयश आल्यावर आता पुण्याहून एक नवी टीम वाघाला पकडण्यासाठी आली आहे. पण हाय रे देवा… या टीमला देखील अद्याप वाघाचे दर्शन झालेले नाही. वाघाचा शोध घेत असताना वनविभागाच्या टीमला मात्र वाघाने मारलेल्या जनावरांचे अवशेष सापडत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये दहशत!
या वाघाने एका महिन्यात जवळपास तीस ते चाळीस जनावरांचा फडशा पाडल्याने धाराशिव जिल्ह्यातील काही भागात दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी आपल्या जनावरांच्या सुरक्षेविषयी चिंतेत आहेत.
हा वाघ अखेर कधी आणि कसा पकडला जातोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वनविभागापुढे हे मोठं आव्हान आहे. तोपर्यंत वाघाचे लपंडाव आणि वनविभागाचा पाठलाग सुरूच राहणार आहे.