धाराशिव : विदर्भातून टिपेश्वर जंगल सोडून धाराशिव जिल्ह्यात आलेला वाघ सध्या सगळ्यांचा मेंदूचा ताबा घेत आहे. पण वन विभागाला मात्र तो काही केल्या ताब्यात येत नाही. या वाघाने जंगलापासून शहरापर्यंत अशी सफारी सुरू केली आहे की, वाटतंय हा वाघ नाही, तर एखादा अनुभवी पर्यटक आहे.
पाचशे किमीचा हा प्रवास या वाघाने अगदी बिनधास्त पार पाडला आहे. रामलिंग अभयारण्यापासून बार्शीच्या रानावनात त्याचा मुक्त संचार सुरू आहे. २३ डिसेंबरला दर्शन दिलं, पण त्यानंतर हा वाघ इतका बिझी झाला आहे की, वन विभागाला ‘अपॉइंटमेंट’च मिळत नाही.
‘सतत फिरतीवर असलेला वाघ’ – वन विभाग अजूनही हतबल
वाघाचं फिरणं इतकं अनियमित आहे की, तो आज येथे तर उद्या तिथं. त्याने २० ते २५ जनावरं फस्त केली आहेत. आजच त्याने चोरखळी येथील बालाजी गाढवे यांच्या शेतात बैलाचा बकरा केला. बैलाने मेहनत करून पिकं फुलवायची, आणि वाघाने त्याला संध्याकाळचं जेवण बनवायचं, हा नवा जंगलनियम लागू झाला की काय, अशी परिस्थिती आहे.
वन विभागाचा ‘जंगल सफारी’ दौरा
हा वाघ पकडण्यासाठी ताडोबामधून तब्बल २५ जणांची टीम आली होती. पण त्यांनी वाघ पकडण्याऐवजी जंगल सफारी करून परत जाण्याचं ठरवलं. त्यांचा दौरा असा संपला की, वाघाचं नावच घेतलं तरी गावकरी आता हसतात. ठसे सापडले नाहीत, वाघही नाही. याला म्हणतात वन विभागाचा ‘साफ’ पराभव!
पुण्याच्या टीमचं ‘बैठक मोड’ सुरू
आता पुण्याची टीम धाराशिवमध्ये बसली आहे. पण इथेही वाघ ‘सुखरूप’ आहे आणि अधिकारी मात्र टेन्शनमध्ये! या वाघाने शिकारीची संधी मिळाली तर सोडली नाही, पण वन विभागाने सापळा लावला तरीही त्याला शिकार करता आलेली नाही.
शेवटी वाघ म्हणजे वाघच!
या वाघाने आपली खानदानी शान दाखवून दिली आहे. तो कधी आणि कुठे सापडेल, याचं उत्तर फक्त वाघालाच माहीत. सध्या वन विभागाचा खर्च वाढतोय, गावकऱ्यांची झोप उडतेय, पण वाघ मात्र मजेत फिरतोय! शेवटी हा वाघ आहे, वन विभाग नाही, त्यामुळे त्याला पकडणं एवढं सोपं नाही!