स्थळ: महाराष्ट्र वन विभाग, ‘अत्यंत गोपनीय’ विभाग, धाराशिव
विषय: ‘टायगर T22 उर्फ धाराशिवचे जावई’ यांच्या अनधिकृत जिल्हा दौऱ्याबाबतचा अंतिम अहवाल.
(सदर अहवाल इतका गोपनीय आहे की तो लिहिणाऱ्यालाही तो पुन्हा वाचायची परवानगी नाही)
प्रकरण १: घुसखोरीची नोंद
दिनांक: २३ डिसेंबर २०२४
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सस्नेह वाघाचा नमस्कार,
आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद (आणि थोडी भीती) होत आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील एक ‘पर्यटक’ टिपेश्वर जंगलातून थेट धाराशिव जिल्ह्यात स्थायिक होण्याच्या इराद्याने आले आहेत. सदर पर्यटक हे पायी (चार पायांवर) आले असून, त्यांच्याकडे प्रवासाचे कोणतेही तिकीट किंवा सरकारी ओळखपत्र आढळलेले नाही. त्यांचे सांकेतिक नाव ‘T22’ असले तरी, स्थानिक नागरिक त्यांना ‘अचानक आलेला पाहुणा’ या नावाने ओळखत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तात्काळ एक टीम पाठवावी.
ता.क.: टीम पाठवताना त्यांच्या जेवणाची सोय करू नये, कारण सदर पर्यटक स्वतःची सोय स्वतःच करत आहेत (उदा. पाळीव प्राणी).
प्रकरण २: ताडोबा टीमचा ‘पिकनिक’ अहवाल
दिनांक: १५ जानेवारी २०२५
विषय: १५ दिवसांच्या जंगल सफारीचा अनुभव.
महोदय,
आम्ही, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची विशेष टीम, १५ दिवस T22 वाघाचा माग काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या काळात आम्हाला धाराशिवचे निसर्गरम्य जंगल, स्वच्छ हवा आणि स्थानिक आदरातिथ्य खूप आवडले. आम्ही वाघाच्या पायांचे ठसे पाहिले, त्याच्या डरकाळीचा आवाज (बहुतेक रेकॉर्डेड असावा) ऐकला, पण वाघ काही दिसला नाही. कदाचित तो लाजाळू असावा. आमचे बजेट संपल्याने आम्ही परत येत आहोत.
खर्चाचा तपशील:
- जीपचे पेट्रोल: रु. ५०,०००/-
- अधिकाऱ्यांचा चहा-नाश्ता: रु. ७५,०००/-
- वाघाला घाबरवण्यासाठी आणलेले फटाके: रु. २०,०००/- (जे आम्ही टीम परत येताना आनंदाने फोडले)
प्रकरण ३: पुणेरी ‘टेक’ टीमचा डिजिटल पराभव
दिनांक: २० मार्च २०२५
विषय: ड्रोन आणि सेन्सरच्या अपयशाबाबत.
महोदय,
आम्ही पुण्याहून दोन महिने तळ ठोकून होतो. आम्ही T22 ला पकडण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे आणि मोशन सेन्सर लावले होते. पण हा वाघ तंत्रज्ञानाच्या दोन पावले पुढे आहे, असे दिसते.
आमची निरीक्षणे:
१. ड्रोन हवेत उडताच वाघ गायब होतो. (त्याला ‘एअर-ट्रॅफिक’ आवडत नसावे).
२. कॅमेऱ्यासमोर तो कधीच येत नाही. (कदाचित त्याला ‘कॅमेरा-शाय’ असावा).
३. एकदा तर त्याने एका कॅमेऱ्यासमोर शेपटी हलवून ‘टा-टा’ केल्याचे अंधुक फुटेज मिळाले आहे. (हा नक्कीच पुणेरी वाघ असावा!).
लाखो रुपये खर्च करूनही हाती काहीच न लागल्याने आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकरण ४: वाघाचे ‘गुगल मॅप्स’ आणि खाद्ययात्रा
गुप्तचर (स्थानिक शेतकरी) अहवाल:
हा वाघ नसून ‘झोमॅटो डिलिव्हरी बॉय’ असल्याचा आम्हाला संशय आहे. तो सतत लोकेशन बदलत असतो.
- येडशी: येथील वासरांची चव ‘ओके-ओके’ होती. (रेटिंग: ३/५)
- भूम-वाशी: येथील मेनूमध्ये काही नावीन्य नव्हते. (रेटिंग: २.५/५)
- बार्शी (शेजारील जिल्हा): चांगली सर्व्हिस, पण महाग. (रेटिंग: ३.५/५)
- तुळजापूर (सध्याचा मुक्काम): येथील वासरे ‘आईच्या हातच्या जेवणासारखी’ चविष्ट होती. (रेटिंग: ५/५, Highly Recommended!).
तो मध्ये-मध्ये गायब होतो, तेव्हा कदाचित ‘नेटवर्क’च्या बाहेर जात असावा.
अंतिम निष्कर्ष आणि पुढील दिशा:
गेल्या आठ महिन्यांपासून ‘T22’ हा वाघ नसून एक सरकारी आव्हान बनला आहे. त्याला पकडण्यात आलेले अपयश पाहता, आम्ही खालील उपाययोजना सुचवत आहोत:
१. T22 ला ‘राज्य-अतिथी’ म्हणून घोषित करावे आणि त्याच्यासाठी एक विशेष ‘प्रवास भत्ता’ मंजूर करावा.
२. त्याला ‘धाराशिव जिल्ह्याचे ब्रँड ॲम्बेसेडर’ बनवावे, टॅगलाईन: “आमच्याकडे वाघही राहायला येतो!”
३. त्याला पकडण्याचा खर्च दाखवण्याऐवजी, “व्याघ्र पर्यटन आणि जनजागृती” या गोंडस नावाखाली नवीन बजेट पास करावे.
हा अहवाल तात्काळ नष्ट करावा, अन्यथा आपली नोकरी वाघाच्या जबड्यात जाण्याची शक्यता आहे.
आपला नम्र,
एक त्रस्त वन अधिकारी.