धाराशिव : गेली अनेक दिवस वन विभागाला चकवा देणारा वाघ अखेर भूम तालुक्यातील सुक्टा परिसरात दिसून आला आहे. विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून, T22 हा वाघ धाराशिव जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी दाखल झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचे आढळून आले होते. या वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या जंगलातून ५० जणांची टीम धाराशिव जिल्ह्यात आली होती. मात्र, वाघ सोडाच, वाघाचे ठसे सुद्धा या टीमला दिसले नाहीत. वाघ पुढे आणि टीम मागे अशी अवस्था निर्माण झाली होती. शेवटी निराश होऊन ही टीम परत गेली.
आता वाघाला पकडण्यासाठी पुण्याची टीम आली आहे. पण हाय रे देवा…! या टीमला देखील वाघ दिसला नाही. मात्र, भूम तालुक्यातील सुक्टा परिसरात तो दिसून आला आहे.
या वाघाने एका महिन्यात जवळपास ३० ते ४० जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काही भागात दहशत निर्माण झाली आहे. सुक्टा गावात वाघ आल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत सर्व गाव जागे होते. यावेळी माजी सरपंच अशोक गायकवाड यांनी भूमचे वन अधिकारी गांधले यांना फोन केला असता, त्यांनी “आता निवांत झोपा, सकाळी बघू…” असे उत्तर दिले.
वन अधिकारी सुस्त तर वाघ मस्त झाला आहे अशी परिस्थिती सध्या धाराशिव जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
Video