तुळजापूर: तालुक्यातील सिंदफळ-अमृतवाडी शिवारात गेल्या दोन दिवसांपासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. या वाघाने दोन दिवसांत तीन वासरे फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. भगवान गंधोरे आणि महादेव गंधोरे या दोन शेतकऱ्यांच्या वासरांवर हल्ला करून वाघाने त्यांना ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदफळ-अमृतवाडी शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी भगवान गंधोरे आणि महादेव गंधोरे यांची वासरे दोन दिवसांपासून गायब होती. शोधाशोध केली असता, त्यांना आपली वासरे मृतावस्थेत आढळून आली. वाघाने या वासदांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वाघाच्या हल्ल्यातच या वासरांचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले आहे. मात्र, अद्यापही या वाघाचा ठावठिकाणा लागलेला नाही. वन विभागाकडून वाघाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु वाघ दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
या नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यासही घाबरत आहेत. दिवसाढवळ्या गुरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. वन विभागाने तातडीने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.