तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव रविवारी अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि देवीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.
रविवारी पहाटे सीमोलंघन सोहळा पार पडला. यावेळी देवीला १०८ साड्या गुंडाळून तिची पालखीत मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेत कुंकू आणि फुलांचा वर्षाव केला. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवीची पलंग महालात मंचिका निद्रा सुरू आहे. ही निद्रा पौर्णिमा पर्यंत म्हणजे १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राहील.
१७ ऑक्टोबर रोजी गुरुवारी पहाटे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल आणि छबिना उत्सव साजरा केला जाईल. या दिवशी ४०-४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलापूर येथून लाखो भाविक चालत येऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. तसेच, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
पौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरात किमान दहा ते बारा लाख भाविक हजेरी लावतात. त्यामुळे तुळजापूर नगरी पुन्हा एकदा भाविकांनी फुलणार आहे. या गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीने विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत.
दरम्यान, १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे. भाविकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.