महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी आता पुण्याच्या नामांकित ‘चितळे बंधूं’चा मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून मिळणार, ही बातमी वरवर पाहता भक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि ‘गोड’ आहे. तिरुपतीच्या धर्तीवर प्रसादाचा दर्जा सुधारण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. राजकीय अडथळे पार करून, नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पदच. पण या ‘गोड’ बातमीच्या आवरणाखाली लपलेले व्यवस्थेतील ‘कडवट’ सत्य आणि जुन्या घोटाळ्यांची न साफ झालेली जळमटं पाहता, हा आनंद कितपत खरा मानावा, हाच खरा प्रश्न आहे.
ही नवी व्यवस्था उभी राहत असताना, याच मंदिर संस्थानातील काही वर्षांपूर्वीचा ‘लाडू प्रसाद घोटाळा’ विसरून चालणार नाही. ज्या घोटाळ्यात ई-निविदा प्रक्रियेत कागदपत्रांची फेरफार करून नागेश शितोळे नावाच्या कर्मचाऱ्यावर दोषारोप सिद्ध झाले, त्याला केवळ पुजाऱ्यांनी आणि जागरुक नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरच प्रशासनाने निलंबित केले. पण प्रश्न हा आहे की, शितोळे हा केवळ एक चेहरा होता. या घोटाळ्याच्या साखळीतील इतर सूत्रधारांचे आणि लाभार्थ्यांचे काय? त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का झाली नाही?
हा गैरव्यवहार केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजलेली दिसतात. यापूर्वी हेच प्रसादाचे कंत्राट ‘समाधान ढाबा’ चालवणाऱ्या परमेश्वर नावाच्या व्यक्तीला आणि एका ‘उडपी हॉटेल’ चालवणाऱ्या शेट्टी यांना दिले गेले होते. या कंत्राटांमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे आणि प्रसादाच्या दर्जाशी तडजोड झाल्याचे आरोप झाले, पण आजतागायत त्यातील एकाही दोषीवर कारवाई झालेली नाही, हे वास्तव आहे. ही जुनी प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवलेली असताना, केवळ एक नवे कंत्राट देऊन सर्व काही आलबेल झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.
आज नवे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चितळेंच्या निवडीसाठी जी तत्परता दाखवली, ती कौतुकास्पद आहे. पण त्यांच्या खऱ्या कसोटीचा क्षण तेव्हा येईल, जेव्हा ते केवळ नव्या कंत्राटावर लक्ष न देता, जुन्या घोटाळ्यांच्या फाईल्सवरील धूळ झटकतील. लाडू घोटाळ्यातील ‘शितोळ्यां’ना आणि पूर्वीच्या कंत्राटातील ‘परमेश्वर’ व ‘शेट्टीं’च्या काळातील गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत उभे करतील.
भक्ताला काय हवं असतं? त्याच्या हातात पडणारा लाडू कोणत्या कंपनीचा आहे, यापेक्षा तो ज्या व्यवस्थेतून येतो, ती व्यवस्था किती शुद्ध आणि सात्विक आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. जोपर्यंत घोटाळेबाजांना अभय देणारी व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत बाहेरून कितीही नामांकित ब्रँड आणले, तरी त्या प्रसादाला ‘नैवेद्याची’ खरी पवित्रता लाभणार नाही.
त्यामुळे, चितळेंच्या लाडवाचे स्वागत आहेच, पण हा केवळ धूळफेकीचा एक ‘गोड’ प्रयत्न ठरू नये. या निर्णयासोबतच, मंदिर प्रशासनाने जुन्या घोटाळ्यांची फाईल पुन्हा उघडून दोषींवर कठोर कारवाई करावी. खरा ‘प्रसाद’ हा पारदर्शक कारभार आणि न्याय हाच असू शकतो. अन्यथा, बाहेर चितळेंचा गोड लाडू आणि आत घोटाळेबाजांचा कडवट कारभार, असा दुटप्पीपणा आई तुळजाभवानी आणि तिच्या करोडो भक्तांच्या श्रद्धेशी केलेला मोठा विश्वासघात ठरेल.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह