तुळजापूर : तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणाने गडगडाट केला, पण पोलिसांची कारवाई मात्र ‘थांबा, बघतो’ मोडमध्ये! आतापर्यंत ३५ जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यातले १४ जण जेलमध्ये, उरलेले २१ ‘फरारपंढरी’च्या दिशेने – पोलिसांच्या नजरेआड.
गेल्या १५ दिवसांत अटकेचा ‘दुष्काळ’ पडला आहे. पोलीस चौकशी करतायत की अभिनय, हेच लोकांना कळेनासं झालंय. ८० जणांना सीडीआर व कॉल रेकॉर्डवरून नोटिसा दिल्या गेल्या, पण त्यांचा जबाब नोंदवण्याऐवजी “या हो, नंतर या, पुन्हा या…” अशा स्टाईलने ‘हॅरॅसमेंट चौकशी’चा प्रयोग सुरू आहे. एकूणच वातावरण ‘सीरियस’ कमी आणि ‘सासू-सून मालिके’सारखं जास्त!
विशेष म्हणजे फरारांच्या यादीत तीन पुजाऱ्यांची नावं आली आहेत!
- राहुल कदम : पुजारी आहे, पण मंदिरात कधी येत नाही.
- जगदीश पाटील : फरार – जणू “दर्शन बंद” मोडमध्ये.
- विशाल सोंजी : फरार – देवळात सापडण्याऐवजी ‘डोंगरात’?
लोक विचारतायत की ड्रग्ज प्रकरणात अटक झाली की दोन वर्षं जामीन नाही, मग हे पुजारी मंदिरात येणार तरी कसे? आणि जर येणारच नाहीत, तर ‘मंदिरबंदी’ ही बातमी म्हणजे अगदी “पाणीपुरीवाल्याला व्हिसा रद्द” करण्यासारखं!
तुळजापूरकरांच्या मते सध्या ड्रग्जप्रकरणात अटक आणि कारवाई दोन्हीही “इन्व्हिजिबल मोड”वर आहे. चौकशी आहे की ‘मंत्रोच्चार’, फरार आहेत की ‘मायावी रुपात’ – हे सगळं ठरवायचं आता पोलीस देवतेच्या कृपेवरच!