तुळजापूर: श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी एका बाजूला सामान्य भाविक तासनतास रांगेत तिष्ठत असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकाऱ्यांना मोफत व्हीआयपी दर्शनाची खैरात वाटली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल ८८६ वर्ग-१ अधिकाऱ्यांनी मंदिरात मोफत व्हीआयपी दर्शन घेतल्याची माहिती समोर आली असून, यामुळे मंदिर संस्थानाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत १८ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. याच काळात, मंदिर संस्थानाने व्हीआयपी दर्शन पासच्या विक्रीतून तिजोरीत सव्वा दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. एकीकडे उत्पन्नाचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे त्याच व्हीआयपी सुविधेचा वापर करून ८८६ शासकीय अधिकाऱ्यांना एकही रुपया न घेता दर्शन देण्यात आले. या दुटप्पी धोरणामुळे तुळजापूरमधील सामान्य भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“एकीकडे मंदिर प्रशासन उत्पन्नासाठी व्हीआयपी दर्शन पास विकत आहे आणि दुसरीकडे त्याच पासची अधिकाऱ्यांवर उधळपट्टी करत आहे. सामान्य भाविकांनी तासनतास त्रास सहन करायचा आणि अधिकाऱ्यांनी मात्र थेट प्रवेश मिळवायचा, हा कुठला न्याय?” असा सवाल भाविक विचारत आहेत.
या प्रकारावर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. व्हीआयपी दर्शन पासमधील गैरव्यवहाराविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांनी, मोफत दर्शन देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे मंदिर संस्थानाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.