तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानाच्या कारभारातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नोकरी टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून तब्बल दोन लाख रुपयांची बँक गॅरंटी मागितली जात असून, पैसे नसल्याने एका कर्मचाऱ्याला आपली जमीन गहाण ठेवावी लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे मंदिर संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची बँक गॅरंटी घेण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ७८ लाख रुपये कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एका कर्मचाऱ्याकडे बँक गॅरंटी देण्यासाठी पैसे नसल्याने त्याला आपली जमीन गहाण ठेवावी लागली. जे कर्मचारी ही रक्कम देऊ शकले नाहीत, त्यांच्या मासिक पगारातून ही रक्कम कपात केली जात आहे. आजही ३७ कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात सुरूच आहे.
विशेष म्हणजे, या नोकर भरतीच्या जाहिरातीत बँक गॅरंटीची कोणतीही अट नमूद करण्यात आलेली नव्हती. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून बॉण्डवर सह्या घेऊन ही गॅरंटी वसूल करण्यात आली. हा प्रकार तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या कार्यकाळात घडल्याचे समजते.
महाराष्ट्र नागरी नोकर भरती अधिनियमानुसार, सरकारी किंवा सरकारमान्य संस्थेला नोकर भरतीसाठी कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी घेता येत नाही. असे असतानाही तुळजाभवानी मंदिर संस्थानाने हा नियम पायदळी तुडवून कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी घेतली आहे. याविरोधात कर्मचाऱ्यांनी तीन वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि एकदा मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
याविषयी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी सांगितले की, “मंदिर संस्थानच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत पगार कपात सुरू राहील.” दुसरीकडे, नोकरी जाण्याच्या भीतीने अनेक कर्मचारी यावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
एकीकडे सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद असताना, दुसरीकडे बँक गॅरंटीच्या आर्थिक बोज्याखाली कर्मचारी दबले गेले आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या या मनमानी कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीवर आता शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.