तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने दर्शन पासाच्या दरांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ दिनांक २० सप्टेंबर २०२५ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी लागू असणार आहे. ऐन उत्सव काळात झालेल्या या दरवाढीमुळे भाविकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मंदिर संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रगटणानुसार, देणगी दर्शन पासच्या दरात दुपटीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
असे आहेत बदललेले दर:
- २०० रुपयांचा देणगी दर्शन पास: यासाठी आता भाविकांना ३०० रुपये मोजावे लागतील.
- ५०० रुपयांचा देणगी दर्शन पास: या पासची किंमत थेट दुप्पट होऊन १००० रुपये करण्यात आली आहे.
- २०० रुपयांचा स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पास: हा पास आता ५०० रुपयांना मिळणार आहे.
या दरवाढीबरोबरच, सकाळच्या अभिषेक पासच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सकाळच्या अभिषेकासाठी उपलब्ध असलेल्या पासांची संख्या ३०० वरून ४०० करण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक भाविकांना पूजेचा लाभ घेता येईल.
संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ पासूनचे पुढील अभिषेक पास १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून बुक करता येतील. तर १६ ते १८ सप्टेंबरपर्यंतचे पास १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच बुक करण्याची सोय होती.
शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ (शके १९४७) साजरा होत असताना, उत्सवाच्या काही दिवस आधीच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ही दरवाढ कोणत्या कारणास्तव करण्यात आली आहे, याचा कोणताही खुलासा प्रगटणामध्ये देण्यात आलेला नाही, त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.