तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकास आराखड्याबाबत मुंबईत सांस्कृतिक मंत्र्यांच्या म्हणजे आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर, आराखड्याच्या अपूर्ण आणि अस्पष्ट माहितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने या प्रकरणी संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची जोरदार मागणी केली असून, जोपर्यंत सविस्तर आणि अधिकृत माहिती जाहीर होत नाही, तोपर्यंत गैरसमज वाढत राहतील, अशी भीती व्यक्त केली आहे.
सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य पुरातत्व विभागाने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे, परंतु तो सध्या गोपनीय ठेवण्यात आला आहे. तर, केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दोन्ही अहवाल एकत्रित आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यावर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु हा विकास एकतर्फी नसावा,” असे ते म्हणाले. मंडळाने काही प्रमुख मागण्या आणि चिंता व्यक्त केल्या आहेत:
- माहितीचा अभाव: विकास आराखडा आणि गाभाऱ्याच्या स्थितीबद्दल सविस्तर आणि स्पष्ट माहिती जाहीर होत नसल्याने लोकांमध्ये गैरसमज आणि दिशाभूल होत आहे. त्यामुळे दोन्ही अहवाल आणि विकास आराखड्याची सविस्तर माहिती पुजारी मंडळ आणि तुळजापूरकरांना देण्यात यावी.
- परंपरा आणि पूजा-विधी: विकास आराखड्यामुळे मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी, पूजा, रूढी-परंपरा, कुळधर्म-कुळाचार आणि भाविकांच्या नवस सेवा बंद होणार नाहीत, यासाठी ठोस आणि लेखी हमी मिळावी. सध्याच्या आराखड्यात याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.
- एकतर्फी विकासाला विरोध: पुजारी मंडळ विकासाला पाठिंबा देत आहे, मात्र तो सर्वांना विश्वासात घेऊन व्हावा. सध्याचा आराखडा एकतर्फी असून, त्याचे पुढील ५ ते ७ वर्षांत शहरावर काय परिणाम होतील, याचा विचार झालेला नाही.
- लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा: जर शासनाने अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली, तर जनजागृतीसाठी लोकशाही मार्गाने एकदिवसीय आंदोलन करण्याचा विचार मंडळ करत आहे.
विपीन शिंदे यांनी सांगितले की, “हे काम करताना आमच्यावर अनेक दबाव येत आहेत, पण तुळजापूरचे भविष्य, मंदिरातील अखंड पूजा आणि भाविकांच्या सोयीसाठी आमचा लढा सुरूच राहील. गैरसमज टाळण्यासाठी शासनाने तातडीने लेखी हमी आणि सविस्तर माहिती द्यावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे.” माहिती मिळाल्यानंतर पत्रके आणि डिजिटल माध्यमांद्वारे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुजारी मंडळाच्या प्रश्नावर मंत्री निरुत्तर!
बैठकीदरम्यान झालेला एक संवाद विशेष लक्षवेधी ठरला. जेव्हा सांस्कृतिक मंत्री महोदयांनी पुजारी मंडळाला त्यांचे मत विचारले, तेव्हा मंडळाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट उत्तर दिले.
पुजारी मंडळ: “राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभागाचा अहवाल आम्हाला देण्यात आलेला नाही. तो पाहिल्याशिवाय आम्ही आमचे मत कसे मांडायचे?”
मंडळाच्या या थेट प्रश्नावर मंत्री महोदय निरुत्तर झाले आणि शांत राहिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.