धाराशिव: “तुळजाभवानी मंदिर संस्थान भाविकांची लूट करत आहे,” अशा आशयाच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, यावर आता खुद्द मंदिर संस्थानने आणि जिल्हा प्रशासनाने सविस्तर खुलासा केला आहे. “दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न करण्याचा निर्णय हा भाविकांना लुटण्यासाठी नसून, दानाच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी आहे,” असे स्पष्टीकरण मंदिर प्रशासनाने दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील भोसरी येथील भाविक सुरज कृष्णा टिंगरे हे १९ ऑक्टोबर २०२५ रोजी देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन रांगेतील दानपेटी क्रमांक १२ मध्ये पैसे टाकताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चुकून आत पडल्याचा दावा त्यांनी केला होता. ३० ऑक्टोबरला त्यांनी ही अंगठी परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रशासनाने १६ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे त्यांना नकार कळवला होता. यावरून वाद निर्माण झाला होता.
नियम काय सांगतो?
यावर स्पष्टीकरण देताना मंदिर संस्थानने ३ ऑगस्ट २०१७ च्या ठरावाचा दाखला दिला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला होता. यानुसार, “भाविकांकडून नजरचुकीने दानपेटीत पडलेल्या मौल्यवान वस्तू या ‘दान’ समजल्या जातील आणि त्या परत दिल्या जाणार नाहीत,” असे स्पष्ट ठरवण्यात आले आहे.
कठोर निर्णय का घेतला?
हा नियम का करावा लागला, यामागील धक्कादायक कारणही संस्थानने उघड केले आहे:
-
फसवणुकीचे प्रकार: यापूर्वी अनेकदा काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी “आमची वस्तू चुकून पडली” असा खोटा दावा करून दानपेटीतील इतर मौल्यवान वस्तू लांबवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार घडले आहेत.
-
सुरक्षितता: दानपेटीची सुरक्षितता आणि व्यवहारातील पारदर्शकता टिकवण्यासाठी हा निर्णय घेणे अनिवार्य झाले.
-
इतर देवस्थाने: केवळ तुळजापूरच नव्हे, तर देशातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी असेच नियम लागू आहेत.
मंदिर संस्थानचे आवाहन
प्रसारमाध्यमांनी अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या देऊन गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन संस्थानने केले आहे. तसेच, भाविकांनी दानपेटीत रक्कम टाकताना आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून असा प्रसंग ओढवणार नाही, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.





