तुळजापूर : तुळजापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह शहरातील बायपास रस्त्यावरील पुलाखाली आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चित्रा पाटील असे मृत महिलेचे नाव असून, आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे.
शहरातील रहिवासी असलेल्या चित्रा पाटील (वय अंदाजे ६५) या १८ जुलैपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करून आणि सोशल मीडियावर माहिती प्रसारित करूनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर १९ जुलै रोजी त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात चित्रा पाटील हरवल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ओम निकम (वय ३०, रा. तुळजापूर) या संशयिताची चौकशी केली, मात्र त्याने सुरुवातीला काहीही माहिती देण्यास नकार दिला.
आरोपीने स्वतः दिली खुनाची कबुली
रविवारी, २० जुलैच्या रात्री या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. आरोपी ओम निकम स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने चित्रा पाटील यांचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. या कबुलीजबाबामुळे पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागली आणि आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली.
पुलाखाली आढळला हात बांधलेला मृतदेह
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूर-धाराशिव बायपास रस्त्यावरील एका पुलाखालील झाडीझुडपात शोध घेतला असता, त्यांना चित्रा पाटील यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले असल्याने हा खून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूरपणे केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
आरोपी ओम निकम याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने हे अमानुष कृत्य का केले, यामागे नेमके काय कारण होते, याचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.