तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचा तिढा सुटला आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी घोषित झाली. गेले तीन महिने जोरदार तयारीत असलेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अशोक जगदाळे उर्फ भाऊ मात्र या निर्णयावर खूप नाराज झाले आहेत. दरवेळी भरपूर पैसा खर्च करून उमेदवारी मिळवण्याची आशा बाळगणारे भाऊ यावेळी मात्र धीरज पाटील यांच्या निष्ठेला हरवू शकले नाहीत.
भाऊंचा राजकीय प्रवास: पैसा आणि फसलेले प्रयत्न
भाऊंचे मूळ गाव नळदुर्ग आहे आणि ते एक मोठे उद्योगपती आहेत. मुंबई आणि सोलापूर येथे बिल्डर म्हणून ओळखले जाणारे भाऊ राजकारणात मात्र काही जमवू शकलेले नाहीत. लोक त्यांना प्रेमाने ‘भाऊ’ म्हणतात, पण तुळजापूर विधानसभेत विजय मिळवण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पुन्हा अधुरेच राहिले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाऊंनी खूप प्रयत्न केले, पण परिणाम मात्र अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही. विधान परिषदेत भाजपचे सुरेश धस यांच्याकडून पराभूत झाले, आणि २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवूनही त्यांना अपयश आले होते.
फेसबुकवरची हवा पण उमेदवारी फुस्स
तुळजापूर विधानसभा निवडणुकीत यावेळी भाऊ राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक होते. सोशल मीडियावर ‘भाऊ लढणार, बदल घडणार’ अशी हवा निर्माण केली गेली. त्यांच्या समर्थकांनी तर फटाके वाजवून उमेदवारी मिळण्याची घोषणाही केली होती. पण काँग्रेसला तुळजापूरची जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाऊंनी काँग्रेसमध्ये जाण्याचेही प्रयत्न सुरू केले. दिल्लीपर्यंत ओळखी वापरून, लॉबिंग करून त्यांनी तिकिट मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण शेवटी काँग्रेसने ऍड. धीरज पाटील यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवला आणि उमेदवारी त्यांनाच दिली.
भाऊंचे खास प्रयोग आणि खर्चाचा फसलेला फंडा
उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊंनी प्रचंड खर्च केला. शेतकऱ्यांसाठी मेळावे घेऊन बियाणे वाटप केले, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ सारखे कार्यक्रम घेऊन बक्षिसे दिली, आणि तरुणांसाठी रोजगार मेळावे घेतले. इतक्या सगळ्या कार्यकर्मानंतरही उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा खर्च वाया गेला असेच म्हणावे लागेल. लोकांना कामांमधून आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न आता केवळ एक शोभेचा भाग बनून राहिले आहेत.
भाऊंचे भवितव्य: बंडाची वल्गना आणि नव्या वाटेचा शोध
उमेदवारी फिस्कटल्यामुळे आता भाऊंच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. तुळजापूरच्या जमिनीवर निवडणुकीच्या वेळीच पाय ठेवणाऱ्या भाऊंच्या मनात आता बंड करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या आघाडीकडून लढण्याची संधी, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सहारा घेऊन बंडखोरी करण्याचा विचार, किंवा अन्य राजकीय खेळींवरही ते काम करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे फक्त दोनच दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
भाऊंना मिळालेला धडा: ‘पैसा म्हणजे सर्वस्व नाही’
राजकारणात सगळे काही पैशावर मिळते, हा भाऊंचा ठाम विश्वास होता, पण यावेळी त्यांची समज खोटी ठरली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी निष्ठा महत्त्वाची ठरली, आणि भाऊंच्या पैशांनी त्यांना मदत केली नाही. निवडणुकीतील हा फसलेला फटाका भाऊंसाठी एक धडा ठरला आहे. राजकारणात कधी कधी पैसा असला तरी निष्ठेचे मोल जास्त असते, हे त्यांना अनुभवातून शिकायला मिळाले आहे.
तर, तुळजापूर विधानसभेत ‘भाऊंचा फुस्स फटाका’ म्हणत लोकांनी ही निवडणूकही एका विनोदी घटनेप्रमाणेच घेतली आहे.