धाराशिव – विधानसभा निवडणुकीसाठी महविकास आघाडीकडून धाराशिव आणि परंडा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता तुळजापूर आणि उमरगा मतदारसंघासाठी कुणाला संधी मिळणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 65 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. धाराशिवमधून विद्यमान आमदार कैलास पाटील तर परंडा विधानसभा मतदारसंघातून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली तेव्हा जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी एकमेव कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले होते. धाराशिवसाठी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, त्यामुळे समोर कोण राहील, याकडे लक्ष वेधले आहे.
परंडा मतदारसंघात दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वारसा हक्कानुसार त्यांच्या चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रणजित पाटील यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे.त्यांचा मुकाबला शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) चे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्यासोबत होईल.
काँग्रेस – शिवसेना ( उद्धव ठाकरे ) – राष्ट्रवादी ( शरद पवार ) या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाकडून माजी आमदार राहुल मोटे इच्छुक होते. सलग तीन वेळा विजयी झालेले राहुल मोटे सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाले होते. स्व. ज्ञानेश्वर पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण उद्धव ठाकरे यांनी परंड्याची जागा स्वतःकडे खेचली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे हे आपले काका अजित पवार यांच्यासोबत न जाता, शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले होते ,तसेच मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे खा. ओमराजे निंबाळकर यांचा जोरदार प्रचार केला होता. पण विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आल्याने मोटे आता कोणती भूमिका घेणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
तुळजापूर आणि उमरगा मतदारसंघासाठी कुणाला संधी मिळणार ?
तुळजापूर मतदारसंघ काँग्रेसला आणि उमरगा मतदारसंघ हा शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत प्राप्त झाले आहेत.
तुळजापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण आणि धीरज पाटील इच्छुक आहेत, पण मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांचा पत्ता कट झाला आहे. आता धीरज पाटील की अशोक जगदाळे हे उद्या फायनल होणार आहे.
अशोक जगदाळे हे सध्या राष्ट्रवादीमध्ये असून, तिकीट फायनल झाले तर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.