तुळजापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचं रण पेटलंय आणि गावोगावी ‘कमळ विरुद्ध पंजा’ अशा दोन मोठ्या चिन्हांची जोरदार झुंज सुरू आहे. या रणांगणात भाजपचे आ. राणा जगजीतसिंह पाटील आणि त्यांच्या परिवारातील ‘सुपरस्टार टीम’ प्रचाराच्या मैदानात उतरली आहे, तर काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील यांची ‘हळदी-कुंकू टीम’ही एक नवा ‘फॉर्म्युला’ घेऊन मैदानात उतरली आहे. लोकांसाठी ही प्रचार मोहीम म्हणजे एकदम रंजक नाटक झालंय; जणू काही राजकीय तमाशाच चालू आहे.
भाजपची बाजू: “कमळ’ दाबा, जिव्हाळा वाढवा!
आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी गावोगावी फेरफटका मारण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक गावात जाऊन ते मतदारांना सांगताहेत, “हे बघा, कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा, मग बघा तुमचा गाव कसा सुवर्णमयी होतो.” त्यांच्या या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आणि मुलगा मल्हार पाटील यांनीही प्रचारात उडी मारली आहे. आता ते पूर्ण ‘पाटील फॅमिली शो’ बनला आहे, जिथे प्रत्येकजण आपला ‘स्पेशल स्क्रिप्ट’ वाचून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतंय.
अर्चनाताईंनी प्रचारात उतरून ‘लाडक्या बहिणींच्या’ नावाने लोकांना खुश करण्याचं ठरवलं आहे. त्या गावोगावी सांगताहेत की, “महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना महिन्याला २१०० रुपये मिळतील! वर्षाला चक्क २५,२०० रुपये!” गावातल्या महिलांनी हसत विचारलं, “आता हे चमत्कार फक्त निवडणुकीतच का ऐकायला मिळतात? पाच वर्षांनी फक्त एकदा का लाडकं म्हणून बोलावं लागतं?” काहीजणींच्या चेहऱ्यावर मिश्कील हास्य येतंय तर काही थोडं विचार करतायत, “आम्ही बहिणी आहोत की मतदार?”
मल्हार पाटील हे युवा नेते म्हणून प्रचंड उत्साहाने प्रचारात उतरलायेत. त्यांच्या भाषणातून थेट जोश ओसंडून वाहतोय. ते कॉर्नर बैठका घेत गावागावात तरुणांना सांगत आहेत, “तुम्ही सगळे आमचे आहात, तुमच्यासाठी आम्ही आहोत!” ऐकायला छान वाटतं, पण गावातल्या तरुणांना मनात विचार येतोय, “हे भारीच! पण रोजगाराचं काय? जोश आणून आपण पोट भरू का?”
काँग्रेसची बाजू: हळदी-कुंकू मोहीम’ – सांस्कृतिक नात्याचा धागा
यात काँग्रेसचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांच्या पत्नी, डॉ. शुभांगी धीरज पाटील प्रचारात पहिल्यांदाच उतरल्या आहेत. त्यांची शैली मात्र थोडी हटके आहे. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात ‘हळदी-कुंकू’चा कार्यक्रम चालवला आहे. घरोघरी जातात, महिलांना हळदीकुंकू लावताना, थोडीशी ओळख वाढवून सांगतात, “हाताचा पंजा दाबा, म्हणजे आपला माणूस मताधिक्याने विजयी होईल.”
गावातील बायका-प्रवासातल्या या नात्याचं बंधन साधत आहेत. काही जणी उत्सुकतेने विचारतात, “अहो, हे हळदी-कुंकू नेहमीच लावा ना!” काही थोडंसं हसत, तर काहीजणी खरोखरच विचारात पडतायत, “हे सगळं खरंच आहे का? निवडणूक संपल्यावर पुन्हा कधी हळदी-कुंकू भेटेल का?”
मतदारांची ‘कॉमेंट्री’: राजकीय नाटकाचा आनंद
आता निवडणुकीचं वातावरण पाहता मतदार मात्र या राजकीय तमाशाचा पुरेपूर आनंद घेतायत. काहीजण म्हणतात, “आम्हाला आता वेगवेगळ्या नाटकांचा आनंद घ्यायला मिळतोय. कमळ, पंजा, हळदी-कुंकू, सगळे कार्यक्रम चालू आहेत.” काही गावकरी तर म्हणतात, “या हळदी-कुंकू, कॉर्नर बैठकांमुळे गावाला एकदम उत्साह मिळाला आहे.”
आणि हो, प्रचारानंतर लोकांचं एका गोष्टीवर एकमत आहे, “कुणाचंही सरकार येऊ दे, पण हळदी-कुंकू, रोजगार, लाडक्या बहिणींसाठी वर्षाला २५,२०० रुपये, आणि बाकी सगळं खरंच असेल का?” प्रत्येकजण आता निवडणुकीच्या या तमाशाचं पाऊल, फक्त ‘बघतोय’ म्हणत थोडंसं मजा घेत आहे.
तर ही आहे आमची तुळजापूरची निवडणूक; जिथे प्रचाराच्या नावाखाली एकदम चंगळ चाललीय. गावकरी फक्त हसतायत, “निवडणुका तर होत राहणार, पण हे सर्व ‘कमळ विरुद्ध पंजा’ची मजा घेण्याचा आनंद आमचा आहे!”
– बोरूबहाद्दर