धाराशिव: तुळजापूर विधानसभा मतदार संघात (२४१) झालेल्या बोगस मतदार नोंदणी प्रकरणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, गुन्ह्याचा तपास जलदगतीने करून स्वयंस्पष्ट अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून तुळजापूर मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्राच्या आधारे जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांना एक पत्र जारी केले. या पत्रामध्ये, खासदारांच्या पत्राचा संदर्भ देऊन बोगस मतदार नोंदणी संदर्भात दाखल गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती आणि पोलीस कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करण्यासाठी आपल्या स्तरावरून निर्देश देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
यापूर्वी १९ ऑगस्ट २०२५ रोजी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी देखील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती मागवली होती. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा संदर्भ देत, सायबर सेल, धाराशिव येथे १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल झालेल्या FIR क्र. ००१ बाबत पोलीस यंत्रणेकडून काय कार्यवाही सुरू आहे, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
जवळपास वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल होऊनही तपासात अपेक्षित प्रगती न झाल्याने अखेर खासदार राजेनिंबाळकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यांच्या तक्रारीनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून तपासाला वेग देण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तुळजापूर बोगस मतदार नोंदणी: काय आहे संपूर्ण प्रकरण?
तुळजापूर विधानसभा मतदार संघात ‘व्होटर हेल्पलाईन’ ॲपचा वापर करून बनावट आधारकार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारे बोगस मतदार नोंदणी करण्याचा एक संघटित प्रयत्न निवडणूक आयोगाने हाणून पाडला होता. या प्रकरणात गुन्हा नोंद होऊन जवळपास एक वर्ष झाले असले तरी, पोलीस तपासात विशेष प्रगती झालेली नाही आणि मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) अद्याप मोकाट आहे.
अशी केली होती फसवणूक:
- ॲपचा गैरवापर: ‘व्होटर हेल्पलाईन’ या ॲपच्या माध्यमातून २ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे ६,२०० पेक्षा अधिक नावे मतदार म्हणून नोंदवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते.
- बनावट आधारकार्ड: अर्ज दाखल करताना अस्तित्वात नसलेले बनावट आधार कार्ड वापरण्यात आले. एकाच मुलीचा फोटो वापरून वेगवेगळी नावे आणि पत्ते असलेली आधारकार्ड तयार करण्यात आली. उदाहरणार्थ, एका कार्डवर सुनील पवार (पत्ता: बेंबळी) तर दुसऱ्या कार्डवर पूनम चव्हाण (पत्ता: आरळी खुर्द, तुळजापूर) असे नाव होते. विशेष म्हणजे, या दोन्ही कार्डांचे आधार नंबर वेगळे असले तरी एनरोलमेंट क्रमांक (4892/89659/414) एकच होता. हाच एनरोलमेंट नंबर हजारो आधार क्रमांकासाठी वापरण्यात आला. सर्व आधारकार्ड २३ मे २०१९ रोजी डाऊनलोड करून जारी केल्याची तारीख दर्शवतात.
- हजारो सिमकार्डचा वापर: एका लॉगीनवरून जास्तीत जास्त ५ ऑनलाइन अर्ज भरता येतात. त्यामुळे ६,२०० अर्ज भरण्यासाठी जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आल्याचा अंदाज आहे.
- परप्रांतीय नावे: बोगस नोंदणी अर्जांमध्ये सत्यपाल, कपूर, अय्यर, खंडेलवाल अशी परप्रांतीय वाटणारी आडनावे वापरण्यात आल्याचे दिसून आले आहे.
असा उघडकीस आला प्रकार:
हे सर्व अर्ज ऑनलाइन दाखल झाले होते आणि मंजुरीसाठी बीएलओ (BLO) स्तरावर प्रलंबित होते. मात्र, प्रशासनाला वेळीच संशय आल्याने ते सतर्क झाले आणि बोगस मतदार नोंदणीचा हा मोठा डाव उधळला गेला.
तपासाची सद्यस्थिती:
- गुन्हा नोंद होऊन जवळपास एक वर्ष झाले तरी पोलीस एकाही व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
- या संघटित गुन्हेगारीमागील आरोपी आणि ‘मास्टरमाइंड’ अद्याप समोर आलेले नाहीत.
- निवडणूक आयोगाने सुमारे ६,२०० अर्ज आणि संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे तपासासाठी दिली आहेत.
- तपासात प्रगती होत नसल्याने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आणि तपास जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.