तुळजापूर: तालुक्यातील यमगरवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गज आणि काठीने dot मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यमगरवाडी येथे घडली. फिर्यादी शिवाजी मल्हारी गायकवाड (वय ३०, रा. यमगरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुरेश नरहरी मारकड, खंडु निवृत्ती माने, सोमनाथ सुरेश मरकडे, आणि परमेश्वर विलास कांबळे (सर्व रा. यमगरवाडी) यांनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून शिवाजी गायकवाड यांना लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने आणि काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर शिवाजी गायकवाड यांनी ३१ ऑगस्ट रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.