तुळजापूर – तुळजापुरात रस्त्याच्या कामावरून दोन गटात झालेल्या राड्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हाणामारीत तलवार, चाकू आणि गोळीबाराचा वापर झाल्यानंतर माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना जाब विचारला आहे.
“पिटू गंगणेला जीव घेण्याचा परवाना दिलाय का?”
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना मंजुषा मगर म्हणाल्या की, “पिटू गंगणे हा आमदार राणा पाटील यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे गंगणे यास दुसऱ्याचा जीव घेण्याचे लायसन्स खुद्द राणा पाटील यांनीच दिले आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तुळजापूरची शांतता भंग करण्यास पूर्णपणे आमदार राणा पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“राजकीय हस्तक्षेप न करता चौकशी करा”
मंजुषा मगर यांनी आमदार पाटलांना खुले आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, “राणा पाटील यांनी पुढे येऊन सांगावे की, ‘मी या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही आणि या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल’.” पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली न येता कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“तुळजापूर बिहारपेक्षा वाईट”
शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवताना मगर म्हणाल्या की, “सध्या तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षाही वाईट झाली आहे. शहरात दिवसाढवळ्या गुंडगिरी आणि दहशत सुरू आहे. गोळीबार आणि तलवारी निघत असल्याने शहरातील महिला भयभीत झाल्या आहेत. सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.”
घटनेची पार्श्वभूमी:
गोलाई चौकातील रस्त्याच्या कामावरून भाजपचे उमेदवार पिंटू गंगणे आणि काँग्रेसचे अमर मगर (ऋषी मगर) यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. यात तलवारी आणि चाकूचा वापर झाला असून, काँग्रेस उमेदवार अमर मगर यांचे पुतणे, माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा भाऊ कुलदीप मगर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोलापूरला हलवण्यात आले आहे. तसेच, गंगणे यांच्या भाच्याने गोळीबार केल्याचाही आरोप आहे. २१ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालापूर्वीच हा हिंसाचार झाल्याने तुळजापूर हादरले आहे.






