तुळजापूर: तुळजापूर शहरात मंगळवारी काँग्रेस उमेदवाराच्या भावावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण अधिकच तापले आहे. जखमी कुलदीप मगर यांचा जबाब पोलिसांनी अर्धवट नोंदवल्याचा आरोप करत गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी वातावरण चिघळले असता, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मध्यस्थी करत पोलीस प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी तुळजापूर शहरात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू कुलदीप मगर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हा हल्ला भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिटू गंगने याने पाळलेल्या गुंडांनी केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी कुलदीप मगर यांच्यावर कोयत्याने वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून सध्या सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत.
कुलदीप मगर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असली तरी, पिटू गंगनेचा भाचा अद्याप फरार आहे. त्यानेच गोळीबार केल्याचा आरोपही मगर कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात गोंधळ का?
कुलदीप मगर यांचा घेतलेला जबाब हा पोलिसांनी अर्धवट घेतला असून, त्यांचा ‘पुरवणी जबाब’ (Supplementary Statement) घेण्यात यावा, अशी मागणी अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांनी केली आहे. या मागणीसाठी ऋषी मगर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर नेते गुरुवारी सकाळपासून तुळजापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
पोलिस निरीक्षक मांजरे हे पुरवणी जबाब घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ऋषी मगर यांनी केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या ऋषी मगर यांनी इशारा दिला की, “जर पोलिसांनी पुरवणी जबाब घेतला नाही, तर कुलदीप मगर यांना आयसीयू (ICU) मधून थेट पोलीस ठाण्यात आणून बसवू.”
खासदार ओमराजेंचा ‘दणका’
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी फोनवरून ऋषी मगर यांची समजूत काढली. तसेच, पोलीस निरीक्षक मांजरे यांना फोनवरच फैलावर घेत कर्तव्यात कसूर न करण्याबाबत सुनावले. खासदारांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






