विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच, तुळजापूर मतदारसंघात निवडणुकीची धूळ उडायच्या आधीच ‘तोतया’ मतदारांचा धुराळा उडाला आहे! तब्बल 6200 फर्जी मतदार उघडकीस आले असून, या मतदारांना बोगस आधारकार्ड वापरून यादीत नोंद करण्याचा प्रयत्न झाला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी हा प्लॅन बिनविरोध हाणून पाडला!
आता हे सगळं होतंय कसं, विचाराल? तर फर्जी आधारकार्ड तयार करण्यासाठी वापरलेले मोबाईल नंबर बंद आहेत. त्यात सिम कार्ड कोणाच्या नावावर आहेत, त्याचाही शोध लागेना! म्हणजे सगळंच ‘बोगस’ – नाव बोगस, आधारकार्ड बोगस, पत्ता बोगस, आणि आता पोलिसांना हे शोधायचंय.
फेसबुकवरून नावे शोधून अज्ञात लोकांनी हा धंदा सुरु केला, पण पोलिसांच्या पुढे प्रश्न: “हे बोगस लोक मिळणार कसे?” तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण आता हे बोगस आधारकार्ड धारी मास्टरमाईंड शोधणं म्हणजे… अहो, जणू स्कॉटलंड पोलिसांची बरोबरी करणं!
आणि पोलिसांची काय अवस्था आहे? आई तुळजाभवानीच्या नगरीत रोज चोऱ्या होतात. हे चोर इतके धाडसी आहेत की, पोलिसांचे पाकिटं देखील मारतात! आता अशा परिस्थितीत हे तोतया मतदार बनवणारे मास्टरमाईंड शोधणं म्हणजे, सूर्य आणि काजवाची तुलना करण्यासारखं आहे. स्कॉटलंड पोलिसांची तुलना महाराष्ट्र पोलिसांशी पूर्वी होत होती, पण आता… तुळजापूर पोलिस आणि स्कॉटलंड यांच्यात अंतर अगदी दिवा आणि काजवाइतकं दिसून येतंय!
तर मंडळी, निवडणुकीच्या रणधुमाळीत तोतया मतदारांमुळे तुळजापूर पोलिसांची कसरत पाहायला हवी. आता ते स्कॉटलंडच्या पद्धतीनं मास्टरमाईंडला शोधतील की नाही, हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल!