तुळजापूर : विधानसभा निवडणुकीसाठी तुळजापूर मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.२६ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेला गालबोट लावणारा गंभीर प्रकार समोर आला आहे.
बोळेगाव येथे एका मतदाराने मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असतानाही मोबाईलचा वापर करत मतदानाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. “तयारीला लागा, गुलाल आपलाच” या उधळणाऱ्या कॅप्शनसह राम हनुमंत सुतार यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि मतदान प्रक्रियेच्या गुप्ततेचे हे जाहीरपणे उल्लंघन असून, प्रशासनाने याचा तात्काळ निषेध नोंदवला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी मतदान केंद्राध्यक्षांना दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाची कारवाईची तयारी
हा प्रकार केवळ नियमांचे उल्लंघन नाही, तर लोकशाही प्रक्रियेचा अवमान आहे. निवडणूक प्रक्रियेला बदनाम करणाऱ्या अशा कृत्यांवर प्रशासन कडक कारवाई करणार आहे. मतदानाची गुप्तता राखणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आणि जबाबदारी असते. मात्र, अशा प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
लोकशाहीसाठी आव्हान
मतदान प्रक्रियेसाठी लागू असलेल्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अशा प्रकारांनी लोकशाहीवरचे विश्वासार्हतेचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिक कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरेल.
प्रशासनाकडून हा प्रकार घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले असून, या प्रकरणातून इतरांना धडा घ्यावा, असा इशाराही देण्यात आला आहे.