तुळजापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे समोर आले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील मतभेद उफाळून आल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत काँग्रेसला तुळजापूरची जागा देण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसतर्फे ऍड. धीरज पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, आणि त्यांनी आपला अर्जदेखील दाखल केला आहे.
जीवनराव गोरे यांचा उमेदवारी अर्ज; आघाडीमध्ये तणाव
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी तुळजापूर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याबरोबरच एबी फॉर्म देखील सादर केला. या घटनेने महाविकास आघाडीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत तुळजापूरमधील जागा काँग्रेसची ठरलेली असतानाही राष्ट्रवादीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे या आघाडीत अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.
परंडा मतदारसंघातही अशीच स्थिती
तुळजापूरसारखीच स्थिती परंडा मतदारसंघातही पाहायला मिळाली आहे. परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे राहुल मोटे यांनी अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह
तुळजापूर आणि परंडा या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेतील या घटनांनी महाविकास आघाडीच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचे धोरण आखले असताना, दुसऱ्या बाजूला पक्षांतील अंतर्गत मतभेद आणि उमेदवार निवडीवरील असहमती आघाडीच्या भवितव्याबाबत शंका निर्माण करत आहे.
तुळजापूर मतदारसंघात ऍड. धीरज पाटील आणि जीवनराव गोरे या दोन्ही उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करून एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीतर्फे कोणते उमेदवार प्रत्यक्ष मैदानात उतरणार याची अनिश्चितता आहे. आता आघाडीतील पक्षांमध्ये हा मतभेद लवकरच मिटणार का, की या मतभेदांमुळे तुळजापूर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.