तुळजापूर : जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने एका महिलेला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या पतीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापुरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनी बब्रु भोसले (वय २८, रा. घाटशिळ रोड, वेताळ नगर, तुळजापूर) यांनी याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घाटशिळ रोडवरील वेताळ नगर येथे ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, आरोपी दत्ता हनुमंत चौगुले, दशरथ यंकप्पा चौगुले, रमेश दत्ता चौगुले आणि रेणू दशरथ चौगुले (सर्व रा. घाटशिळ रोड, तुळजापूर) यांनी सोनी भोसले यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सोनी यांचे पती मनोज धोत्रे हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही लोखंडी रॉड, काठी आणि चपलेने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर सोनी भोसले यांनी मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३५१(२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(r), (s) व ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.