तुळजापूर: तुळजापूर शहरात मंगळवारी हातात तलवारी, चाकू घेऊन तसेच पिस्तूलमधून गोळीबार करून, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणे याच्या आठ साथीदारावर तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुलदिप दिलीप मगर (वय ४०, रा. एस. टी. कॉलनी, तुळजापूर) हे दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास आपल्या शेतातून घराकडे परतत होते. लोहिया मार्गावरून जात असताना विठाई हॉस्पिटलसमोर दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना अडवले.
आरोपी सुरज नन्नु साठे आणि चेतन शिंदे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कुलदिप मगर यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनी (सागर गंगणे, शुभम साठे, शेखर गंगणे, नंदु गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी) मगर यांना घेरले. आरोपींनी “तू विनोद पिटु गंगणेच्या विरोधात प्रचार का केला? तुला आता जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि मानेवर कोयत्याने आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. या झटापटीत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळीही हिसकावून घेतली.
हल्ला केल्यानंतर आरोपी फिर्यादीला उचलून विनोद गंगणे यांच्याकडे नेण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याच वेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांना पाहून जमाव पळून गेला, परंतु जखमी अवस्थेतही फिर्यादीने शुभम साठे आणि सागर गंगणे या दोन आरोपींना पकडून ठेवले होते, ज्यांना नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सध्या फिर्यादीवर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून खालील संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR क्र. ०५०९/२०२५) दाखल करण्यात आला आहे:
१. सुरज नन्नु साठे २. चेतन शिंदे ३. सागर किशोर गंगणे ४. शुभम साठे ५. शेखर किरण गंगणे ६. नंदु गंगणे ७. बालाजी गंगणे ८. अतुल दळवी ९. इतर अनोळखी इसम.
पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० (बेकायदेशीर जमाव व दंगल) तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे करत आहेत.







