धाराशिव – तुळजापूर येथील गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात तब्बल दीड महिन्याच्या निष्क्रियतेनंतर अखेर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तपासातील दिरंगाईबद्दल आवाज उठवल्यानंतर आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना धारेवर धरताच ही कारवाई झाली.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणात एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले होते. यापैकी १४ जणांना अटक झाली होती, तर २२ जण फरार होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून एकाही नवीन आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना धारेवर धरले व तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. या राजकीय दबावानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीस अटक केली. या अटकेमुळे आता अटकेतील आरोपींची संख्या १५ झाली असून, फरार आरोपींची संख्या २१ झाली आहे.
नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी रणजित पाटील यास १४ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने फेटाळले सहा जामीन अर्ज
न्यायालयाने अटकेत असलेल्या संगिता वैभव गोळे (वय ३२, रा. मुंबई), संतोष अशोक खोत (वय ४९, रा. मुंबई), आणि युवराज देवीदास दळवी (वय ३८, रा. तुळजापूर) यांचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला. यासोबतच, याच प्रकरणातील फरार आरोपी आणि संगिता गोळे हिचा पती वैभव अरविंद गोळे (रा. मुंबई) याचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.यापूर्वीही फरार आरोपींपैकी स्वराज्य उर्फ पिनू तेलंग आणि इंद्रजित उर्फ मिठू ठाकूर यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते
दरम्यान, याच प्रकरणातील अन्य तीन आरोपी – संकेत अनिल शिंदे (वय २३, रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (वय २२, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) , अमित अरगडे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या तीन अर्जांवर ८ मे २०२५ रोजी निकाल दिला जाणार आहे..
प्रकरणाची पार्श्वभूमी
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला जप्त केलेला पदार्थ हा एमडी ड्रग्ज असल्याचे प्रयोगशाळा अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी १० हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. खासदारांनी आवाज उठवल्यानंतर झालेली अटकेची कारवाई आणि न्यायालयाने फेटाळलेले जामीन अर्ज यामुळे प्रकरणाला वेग आला असला तरी, अजूनही २१ आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.