तुळजापूर: शहराला हादरवून सोडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिसांनी ४५ ग्रॅम एम.डी. (किंमत २,१५,००० रुपये), गुन्ह्यात वापरलेली महागडी कार (एम.एच. २५ आर ५५९८, किंमत ७,५०,००० रुपये) आणि ४ मोबाईल (किंमत १,७२,००० रुपये) जप्त करत तिघांना अटक केली होती. यामध्ये अमित उर्फ चिमू आरगडे, युवराज दळवी (दोघे रा. तुळजापूर) आणि संदीप राठोड (रा. नळदुर्ग) यांचा समावेश होता.
तपासात मुंबईची मुख्य सूत्रधार संगीता गोळे हिला अटक झाली असली तरी तिचा पती वैभव गोळे अद्याप फरार आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, केवळ १४ जणांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तब्बल २१ आरोपी, गुन्हा दाखल होऊन २१ दिवस उलटले तरी, पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. गेल्या २१ दिवसात एकही आरोपी अटक नाही.
या फरार आरोपींमध्ये माजी नगराध्यक्षांचे पती विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष बाप्पू कणे, माजी सभापती शरद जमदाडे यांसारख्या प्रतिष्ठित (?) व्यक्तींचा समावेश असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि हेतूवर संशय बळावला आहे. पोलीस यंत्रणा नक्की कोणाला पाठीशी घालत आहे?
पोलीस केवळ कागदी घोडे नाचवत असून, गेल्या काही दिवसांत ८० जणांना नोटीस देऊन त्यांचे जबाब नोंदवण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मात्र, फरार आरोपींना पकडण्यासाठी कोणतीही ठोस शोधमोहीम हाती घेतलेली दिसत नाही. दुसरीकडे, काही फरार आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी थेट जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना कायद्याचा आधार मिळतो की पोलीस आपल्या कामगिरीने त्यांना गजाआड करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळे ड्रग्ज रॅकेटचे मुख्य सूत्रधार मोकाट सुटण्याची भीती व्यक्त होत आहे.
फरार आरोपींची यादी:
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
४. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
५. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
६. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
७. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
८. उदय शेटे
९. आबासाहेब गणराज पवार
१०. अलोक शिंदे
११. अभिजित गव्हाड
१२. विनायक इंगळे – तुळजापूर
१३. शाम भोसले – तुळजापूर
१४. संदीप टोले – तुळजापूर
१५. जगदीश पाटील – तुळजापूर
१६. विशाल सोंजी – तुळजापूर
१७. अभिजीत अमृतराव – तुळजापूर
१८. दुर्गेश पवार – तुळजापूर
१९. रणजीत पाटील – तुळजापूर
२०. नाना खुराडे – तुळजापूर
21. अर्जुन हजारे – उपळाई खुर्द, सोलापूर