तुळजापूर – आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी… पण आज याच तीर्थक्षेत्र तुळजापूरला लागलंय ड्रग्जचं ग्रहण! शहराच्या गल्ल्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून नशेचा काळा धूर पसरतोय आणि धक्कादायक म्हणजे, जवळपास दीड हजार तरुण या जीवघेण्या नशेच्या जहरी विळख्यात अडकले आहेत. जिथे भल्या पहाटे आईचा जोगवा ऐकू यायचा, तिथे आता तरुणाईच्या भविष्याचाच खेळखंडोबा मांडला गेलाय. आणि हे सगळं घडत असताना, ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, ते पोलीस मात्र सुरुवातीला ‘थंड’ झोपेत होते, त्यामुळे आज परिस्थिती हाताबाहेर जाऊन रौद्ररूप धारण करण्याची वेळ आली आहे!.
प्रकरण गंभीर, आरोपी मात्र मोकाट!
या प्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आणि आतापर्यंत ३६ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी केवळ १५ आरोपी सध्या जेलची हवा खात आहेत, तर ३ जण पोलीस कोठडीत आहेत. मात्र, तब्बल १८ आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार आहेत. या फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश अनेक प्रश्न निर्माण करत आहे. आश्चर्य म्हणजे, या फरार धनिकांवर अद्याप लूकआऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
राजकीय लागेबांधे आणि दबावाचा गंभीर आरोप!
या प्रकरणाला एक वेगळेच राजकीय वळण लागल्याचे चित्र आहे. फरार आरोपींमध्ये भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा असून, राजकीय दबावामुळेच या ‘मोठ्या’ माशांना अटक होत नसल्याचा गंभीर आरोप जोर धरत आहे. याच ढिसाळ कारभाराचा फटका तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना बसला असून, अवघ्या ९ महिन्यांत त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
नव्या ‘मॅडम’ कडून अपेक्षा, पण आव्हान मोठे!
शनिवारी, नव्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्यासमोर हे मोठे आव्हान ‘आ’ वासून उभे आहे. जनतेच्या मनात एकच सवाल आहे – आता तरी या फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणार का? नवीन पोलीस अधीक्षक विशेष टीम तयार करून धडक अटकसत्र राबवणार का? की हे प्रकरणही ‘तारीख पे तारीख’च्या फेऱ्यात अडकून तुळजापूरच्या तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटत राहणार?
तुळजापूरची जनता आणि तमाम भाविकांच्या नजरा आता पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या पुढील ठोस पावलांकडे लागल्या आहेत. देवभूमीला लागलेला हा ड्रग्जचा डाग पुसून काढण्यासाठी आणि तरुण पिढीला वाचवण्यासाठी तातडीने आणि कठोर कारवाई अपेक्षित आहे. अन्यथा, इतिहासाच्या पानांवर तुळजापूरची ओळख एका वेगळ्याच, काळ्या अध्यायाने लिहिली जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.