तुळजापूरच्या पवित्र भूमीत ड्रग्ज रॅकेट उघड झाल्यामुळे जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. एकीकडे जिल्ह्याच्या लौकिकाला डाग लागला आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात समाजाच्या सुरक्षिततेला विसरून टाकले आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण १९ आरोपी असून त्यापैकी २ अटकेत, १० जेलमध्ये आणि ७ फरार आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी काहींचे राजकीय संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी विश्वनाथ (पिंटू )आप्पाराव मुळे हा आरोपी भाजप आमदार राणा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला, तर भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी तो पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. फरार आरोपी राहुल कदम – परमेश्वर याचा विरोधी पक्षाशी संबंध असल्याचे फोटोही समोर आले आहेत.
मुद्दा असा आहे की, गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असला तरी तो गुन्हेगारच असतो. पक्षीय निष्ठा किंवा राजकीय संबंध गुन्ह्याचे समर्थन करू शकत नाहीत. नेत्यांनी या प्रकरणात एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.
सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या प्रकरणाचा वापर राजकीय भांडवल म्हणून करत आहेत. मात्र, प्रश्न आहे तुळजापूरच्या युवकांचे भविष्य आणि समाजाचे स्वास्थ्य. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांना या दलालांच्या जाळ्यातून बाहेर काढणे हे राजकीय जबाबदारीपेक्षा मोठे आहे.
राजकीय सत्तेचा वापर करून आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी ड्रग्ज रॅकेटचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र एसआयटी (विशेष तपास पथक) नेमणे गरजेचे आहे.
राजकीय नेत्यांनी प्रामाणिकपणे विचार करावा की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे समर्थन करून ते समाजाला कोणता संदेश देत आहेत? एका बाजूला समाजाला योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी असताना, राजकीय दबावाखाली गुन्हेगारांना पाठिंबा देणे हे समाजविघातक आहे.
तामलवाडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, परंतु या प्रकरणाचा तपास स्थानिक पातळीवर मर्यादित ठेवणे योग्य नाही. या गुन्ह्यातील राजकीय प्रभावामुळे तपासावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे तपास कामगिरीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी एसआयटी नेमून पारदर्शक आणि स्वायत्त तपास सुनिश्चित करावा.
समाजानेही या प्रकरणात सजग राहणे आवश्यक आहे. युवकांना ड्रग्जपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे काम करावे. युवकांमध्ये नशेचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणाऱ्या हानीविषयी जनजागृती करावी.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हा समाजाच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे. नेत्यांनी राजकीय लाभासाठी गुन्हेगारांना पाठिंबा देण्यापेक्षा, युवकांचे भवितव्य वाचवण्यासाठी एकत्र यावे. राजकारण बाजूला ठेवून, सर्व पक्षांनी एकत्र येऊन ड्रग्जविरोधी मोहिम उभारावी.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि तुळजापूरच्या प्रतिष्ठेसाठी सर्वच नेत्यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी सहकार्य करावे. न्यायाची कास धरा, अन्यायाला पाठीशी घालू नका!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह