तुळजापूरच्या पवित्र मातीला लागलेला ड्रग्स प्रकरणाचा डाग अजून धुऊन निघायचा बाकी असताना, राजकीय मंडळींनी मात्र यावर कुरघोडीचे रंगीत तंबू उभारले आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना ७२ तासांचा अल्टीमेटम देत चौकशीचा बडगा उगारला, पण आमदार राणाजगजितसिंह पाटील मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर खूश आहेत. एकूण काय, पालकमंत्री चिडले, आमदार गोड झाले, आणि जनता मधल्या फोडणीसारखी तडतडू लागली आहे!
ड्रग्स प्रकरणात पोलीसांनी चांगलीच खलबते उडवली. ड्रग्स माफियांना हुडकण्यासाठी पोलिसांनी नाक्या-नाक्यावर गुप्तहेर बसवले. अखेर तामलवाडी हद्दीत मोठा सापळा रचून ड्रग्ससह आरोपी गजाआड करण्यात आले. पण जनता मात्र याला नवीन डावपेच मानते. “२ वर्षं ही ड्रग्सची चंगळ चालली, तेव्हा कुठे होते हे राजकारणी? आता निवडणुका जवळ आल्या की अचानक सत्यदर्शन झालं?” असा सवाल गल्लीबोळात चर्चिला जातोय.
यात आणखी रंगत म्हणजे, पालकमंत्री प्रताप सरनाईक पोलीस कार्यपद्धतीवर संतापून त्यांच्यावर कारवाई करायला उठले, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील मात्र पोलिसांवर फुल टू विश्वास टाकून मोकळे झाले. जनता गोंधळात! एक जण म्हणतो, “हे पोलीस चुकीचं करतायत,” तर दुसरा म्हणतो, “हे पोलीस भारी काम करतायत!” शेवटी पोलिसांना काय करायचं, हे ठरवायचं कोण?
दरम्यान, समाजसेवक, राजकीय इच्छुक आणि काही स्वतःला शरद जोशी समजणारे नेते यांच्यासाठी हे प्रकरण म्हणजे एक ‘गोल्डन ऑपर्च्युनिटी’ आहे. निवडणुका जवळ आल्याने ड्रग्स प्रकरणाचा फायदा उठवून प्रसिद्धीच्या स्पॉटलाइटमध्ये यायचं, हे ठरलेलंच! “ड्रग्सविरोधात आम्ही झगडतोय!” असं सांगताच, पोस्टरबाजी, मोर्चे, उपोषणाची धमकी, आणि सोशल मीडियावर भावनिक स्टेटसचा मारा सुरू झाला.
शहरात आता प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न – “ही चौकशी खरंच सत्य उघड करेल की फक्त राजकीय ड्रामा आहे?”
– तमाशा सुरूच आहे, आता कुठला एकपात्री प्रयोग होतो ते पाहायचं!