तुळजापूर शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक ओळखीला एक काळी किनार लागली आहे. ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तरुणाईला वेठीस धरून काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी तुळजापूर शहराच्या प्रतिष्ठेची राखरांगोळी केली. पण या प्रकरणाने केवळ ड्रग्ज माफियांच नाही, तर राजकारण्यांच्याही मुखवट्यांवर पडदा टाकण्यास सुरुवात केली आहे!
पोलिसांची कारवाई, पण मोठे मासे कुठे?
पोलिसांनी १६ पैकी १० जणांना गजाआड केले. ६ जण तुरुंगात, ४ कोठडीत, आणि ६ अद्याप फरार. विशेष म्हणजे, चार जणांची नावे गुप्त! का? आणि कोणासाठी? हे प्रश्न लोकांच्या मनात घोळत आहेत.
आता इथे दोन शक्यता असू शकतात.
१) हे चार नावं एवढ्या उच्च पातळीवरील आहेत की त्यांची उघडनामा झाल्यास अनेकांची खुर्ची धोक्यात येऊ शकते.
२) पोलीस अजून पुराव्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि कोणावरही नाहक कारवाई करायची नाही.
पण जर फरार आरोपींची नावे गोपनीयच राहणार असतील, तर लोकशाहीत सत्ताधारी आणि ड्रग माफियांच्यात काय फरक उरला?
सत्तेच्या खुर्चीतून ड्रग माफियांना कवच?
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी थेट भाजपवर आरोप केला आहे. “ड्रग्ज रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्तेच सामील आहेत, आणि आमदार त्यांना वाचवत आहेत!”
यावर भाजपकडून प्रत्युत्तर आले – “पाटील पराभवानंतर बिथरले आहेत, आणि आरोपांचे फटाके फोडत आहेत!”
हीच खरी समस्या आहे! समस्या ड्रग्जची आहे, तर चर्चा राजकारणाची का होते आहे?
२५ हजारात मुलांचा सौदा – कोण जबाबदार?
या रॅकेटमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला. २५ हजार रुपये देऊन त्यांना ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरण्यात आले.
एकीकडे सरकार मुलांसाठी नवनवीन योजना आणते, तर दुसरीकडे हेच राजकीय नेते ड्रग माफियांचे “दत्तक पालक” बनत आहेत!
ज्यांनी समाजाला दिशा द्यायला हवी, तेच या अंधाऱ्या मार्गावर सोडत असतील, तर या पिढीचे भविष्य तरी कुणाच्या हवाली करायचे?
अखेर चौकशी करणार कोण?
१) सीडीआर आणि आर्थिक व्यवहार उघड करावेत.
२) स्वतंत्र एसआयटी चौकशी व्हावी.
३) मुख्य सूत्रधाराला अटक झाल्याशिवाय प्रकरण मिटले असे समजू नये.
यावर भाजपच्या नेत्यांचे मत काय आहे? की फक्त आरोप आणि प्रत्यारोपांची धुळवड खेळायची?
तुळजापूरची पुढची पिढी कोणाच्या हवाली?
आज जर हे ड्रग्ज रॅकेट राजकीय दबावाखाली दडपले गेले, तर हा गुत्ता आणखी भयानक रूप धारण करेल!
तुळजापूरचे पालक आपल्या मुलांना कोणाच्या ताब्यात सोपवत आहेत? राजकारणी, पोलीस, की ड्रग्ज माफियांच्या गठबंधनात?
राजकीय कुरघोडी बंद करून, या शहराला पुन्हा उभं करण्याची वेळ आली आहे. कुणाचाही बचाव न करता, खरं सत्य बाहेर आलं पाहिजे. नाहीतर उद्या तुळजापूरला ‘ड्रग्ज हब’ म्हणून ओळखलं जाईल, आणि तेवढंच पुरेसं असेल आपली बदनामी करण्यासाठी!
– बोरूबहाद्दर