तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण आरोपींची संख्या आता १८ झाली आहे.
पुणे आणि सोलापूरमध्ये धाड – दोन आरोपी जाळ्यात
पोलीस तपास पथकाने सुलतान शेख याला पुणे येथून अटक केली, तर जीवन साळुंके याला सोलापूर येथून गजाआड केले. या अटकेमुळे तुळजापूर ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती फक्त तुळजापूरपुरती नसून, पुणे, सोलापूर आणि इतर भागांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपींची स्थिती : १० जेलमध्ये, २ अटकेत, ६ फरार
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- १० आरोपी जेलमध्ये आहेत
- २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत
- ६ आरोपी अजूनही फरार आहेत
ड्रग्ज रॅकेटचे विस्तारित जाळे
पोलीस तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की, तुळजापूर ड्रग्ज रॅकेट फक्त स्थानिक नाही, तर त्याचे कनेक्शन राज्यभर आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर आणि लोणावळा यांसारख्या शहरांमध्ये रॅकेटने आपली पाळंमुळं घट्ट रोवली आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांवरही संशयाचा साया
या प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. अनेकांना अटक झाली असली तरी बडे मासे अजूनही मोकाट आहेत. पोलिसांच्या कारवाईवर दबावाचे सावट असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस तपास अधिक गतीने सुरू आहे. ड्रग्ज तस्करीचे मूळ शोधण्यासाठी आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. राज्यभरातील ड्रग्ज रॅकेटच्या सूत्रधारांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.