तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अखेर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी “धाराशिव लाइव्ह“ने केलेली मागणी उचलून धरत ड्रग्ज प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी केली.
राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांवर गंभीर आरोप
आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत “जे कुणी आरोपी आहेत, त्यांच्या मुसक्या आवळा” असे सरकारला ठणकावले. तुळजापुरात ड्रग्जची समस्या एवढी गंभीर झाली आहे की, “पान टपरीवर पान जसे सहज मिळते, तसेच ड्रग्ज मिळते” असे गंभीर विधान त्यांनी केले.
एसपीच्या प्रतिक्रियेवर संताप
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी लक्षवेधी मांडल्यानंतर सरकारने त्याचे उत्तर विधिमंडळात देणे अपेक्षित होते. पण धाराशिवचे पोलिस अधीक्षक (एसपी) यांचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
फरार आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार?
आमदारांनी विशेषत: त्या फरार आरोपींचा उल्लेख करत विचारले की, “प्रमुख आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, हे कसे शक्य आहे?” स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग याच्यासह इतर फरार आरोपींना अटक का होत नाही, याचा जाब विचारला.
धाराशिव लाइव्हची मागणी विधिमंडळात पोहोचली
धाराशिव लाइव्हने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी आधीच केली होती आणि ती मागणी विधिमंडळातही जोरदारपणे आमदार कैलास पाटील यांनी मांडली.
राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांची कारवाई अडथळ्यात येत आहे का? फरार आरोपींवर राजकीय दबाव आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत जनता शांत बसणार नाही. धाराशिव लाइव्ह पुढील घटनाक्रमावर बारीक लक्ष ठेवून राहणार आहे.