धाराशिव: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील संशयित विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि ‘धाराशिव लाईव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. या नोटीसीला आता सुनील ढेपे यांनी ॲड. विशाल साखरे यांच्या मार्फत कायदेशीर आणि सडेतोड उत्तर दिले आहे. “व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी रोखठोक भूमिका ढेपे यांनी घेतली आहे.
नेमके प्रकरण काय?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण सध्या हिवाळी अधिवेशनात गाजत असतानाच, या प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांनी ॲड. अंगद पवार यांच्यामार्फत खासदार ओमराजे आणि पत्रकार सुनील ढेपे यांना नोटीस पाठवली होती. “मी ड्रग्जचा केवळ ग्राहक आहे, पेडलर नाही. तरीही माझी बदनामी केली,” असा दावा करत गंगणे यांनी १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
नोटीसीला खरमरीत प्रत्युत्तर:
संपादक सुनील ढेपे यांनी ॲड. विशाल साखरे यांच्यामार्फत दिलेल्या उत्तरात गंगणे यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी उत्तरात खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
१. जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे:
विनोद गंगणे यांच्यावर एन.डी.पी.एस. (NDPS) सारख्या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हा (र.नं. २२/२०२५) दाखल आहे. केवळ जामीन मिळाला म्हणजे निर्दोष मुक्तता झाली असा अर्थ होत नाही. अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढीला ढकलणाऱ्या प्रकरणातील आरोपीला “प्रतिष्ठित” म्हणणे हा समाजाचा अपमान असल्याचे या उत्तरात नमूद केले आहे.
२. ‘चोराच्या उलट्या बोंबा’:
गंगणे हे काही ‘देवदूत’ (Angel) किंवा साधुसंत नाहीत. ज्या व्यक्तीचे नाव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणासारख्या गंभीर गुन्ह्यात जोडले गेले आहे, त्यांनी १० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्यासारखे आहे, अशा शब्दांत ॲड. साखरे यांनी सुनावले आहे.
३. खासदारांच्या भाषणाचे वार्तांकन हा गुन्हा नाही:
संबंधित बातमीतील व्हिडिओ हा एका जबाबदार खासदाराने (ओमराजे निंबाळकर) जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणाचे वार्तांकन आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधींचे म्हणणे जसेच्या तसे जनतेसमोर मांडणे हे मीडियाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ही बातमी लावणे म्हणजे निर्भीड पत्रकारिता आहे, गुन्हा नाही.
४. कायदेशीर लढाईचा इशारा:
गंगणे हे पेडलर नसून केवळ ‘ग्राहक’ असल्याचा बचाव (Defense) हा न्यायालयाच्या अंतिम निकालाचा भाग नाही. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे पत्रकाराला धमकावणे बेकायदेशीर आहे. या नोटीसीद्वारे पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. १० कोटी रुपये देणे तर दूरच, पण माफीही मागितली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रति-दावा ठोकणार:
जर यापुढे जाऊन गंगणे यांनी कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही केली, तर त्याला न्यायालयात पुराव्यानिशी तोंड देण्यास आपण तयार आहोत. तसेच, या खोट्या नोटीसीमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल गंगणे यांच्यावरच प्रति-दावा (Counterclaim) दाखल केला जाईल, असा इशारा संपादक सुनील ढेपे यांनी आपल्या वकिलामार्फत दिला आहे.






